आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय क्षेत्रात विचारमंथन सुरु झाल्याचे चित्र आहे. त्यानुसार, देशाचा आगमी पंतप्रधान कोण असेल यावरही खल सुरु आहे. भाजपाला रोखण्यात जर विरोधकांना यश मिळाले तर त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावरुन राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि मायावती यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. दरम्यान, या तिघांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत आपली काहीही हरकत नसल्याचे जनता दल सेक्युलरचे सर्वोसर्वा आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

https://twitter.com/ANI/status/1026333029277396993

सुरुवातीला काँग्रेसने राहुल गांधी हे आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे म्हटले होते. तसेच आघाडी झाल्यास काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी महिला उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी आणि मायावती यांची नावे पुढे येऊ शकतात, असा प्रश्न पत्रकारांनी देवेगौडा यांना विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, या तिघांपैकी कोणाच्याही उमेदवारीने मला काहीही अडचण नाही. या उत्तराद्वारे आपण पंतप्रधानपदासाठी इच्छुक नसल्याचेच त्यांनी स्पष्ट केले आहे. देवेगौडा यांचे राष्ट्रीय राजकारणातील वजन मोठे असल्याचे सर्वजण जाणतात.

दरम्यान, शरद पवार यांनी नुकतेच सोनिया गांधी, देवेगौडा आणि आपल्याला पंतप्रधानपदाची अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांची मोट बांधणी आपण करु शकतो. त्यासाठी आम्हाला संपूर्ण देश पिंजून काढावा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस ही पारंपारिक युती असली तरी यंदा या युतीत सहभागी होण्यासाठी बसपाच्या मायावतींनादेखील निमंत्रण देणार असल्याचे सुतोवाच पवार यांनी केले आहे. याबाबत मायावतींशी अद्याप बोलणी झालेली नसली तरी त्या या प्रस्तावामुळे खूश होतील असेही पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकारण देशाबरोबरच महाराष्ट्रासाठीही वेगळे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.