दिल्ली सरकार नागरिकांच्या समस्यांकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून पाणी आणि विजेची भरमसाट बिले त्यांनी भरू नयेत, असे आवाहन आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी येथे केले. लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी केजरीवाल यांनी असहकार चळवळीबरोबर बेमुदत उपोषणही सुरू केले आहे.
राजघाट आणि शहीद पार्कला भेट दिल्यानंतर ईशान्य दिल्लीच्या सुंदर नगरी भागातील आपल्या निवासस्थानी येऊन केजरीवाल यांनी उपोषण सुरू केले. आपल्याला पाणी आणि विजेची भरमसाट बिले येत असून ती चुकती करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.  
दिल्लीवासीयांनी अशा प्रकारची बेकायदेशीर बिले भरू नयेत. आपला पक्ष सत्तारूढ झाल्यानंतर ही बिले मागे घेतली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. मी आजपासून उपोषण करीत असून ही बनावट आणि बेकायदा बिले न भरण्याचा निर्धार आपण केला आहे, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले.