News Flash

उज्जैन महाकाल मंदिर : शिवलिंगावर केवळ शुद्ध दुधाचा अभिषेक करावा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

भक्तांना यापुढे शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करता येणार नाही

Experts from ASI and GSI inspect the lingam at the Mahakal temple in Ujjain. (Express Photo)

उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरासंदर्भातील एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. मंदिरातील शिवलिंगाची झिज होण्यापासून थांबवण्यासाठी न्यायालयाने निर्देश दिले आहेत. शिवलिंगावर शिवभक्तांनी पंचामृताचा अभिषेक करु नये. शिवलिंगाला शुद्ध दुधाने अभिषेक घालावा असं न्यायालयाने म्हटलं आहे. भक्तांना अभिषेकासाठी शुद्ध दूध उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मंदिर समितीने स्वीकारली आहे. आम्ही भक्तांना शुद्ध दूध उपलब्ध करुन देऊ. तसेच अशुद्ध दुधाने अभिषेक केला जाणार नाही याचीही आम्ही काळजी घेऊ असं मंदिर समितीने न्यायालयाला सांगितलं आहे. सर्वोच्च न्यालायलाने मंदिरातील शिवलिंगाच्या सुरक्षेसंदर्भात अनेक सूचना केल्या आहेत. न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर प्रकरणाची सुनावणी केली. न्या. मिश्रा यांच्या कार्यकाळातील हा शेवटचा खटला होता. भगवान शिवाच्या कृपेने माझ्या कारकिर्दीमधील हा शेवटचा निकालही मी दिला आहे असं या खटल्याचा निर्णय दिल्यानंतर न्या. मिश्रा यांनी म्हटलं.

शिवलिंगाची झिज होऊ नये आणि त्याचे संरक्षण करण्यासंदर्भातील निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेत. कोणत्याही भक्ताला या पुढे आता शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा लेप लावता, चोळता येणार नाही. तसेच मंदिरातील भस्म आरतीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरतीच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या धुरामुळे शिवलिंगाला हानी पोहचू नये म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. शिवलिंगावरील माळांचा भारही कमी करण्यात यावा असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

दही, तूप आणि मधामुळे होते झिज

दही, तूप आणि मध चोळल्याने शिवलिंगाची झिज होत असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळेच मर्यादित प्रमाणात शुद्ध दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करण्याची मूभा देत इतर सर्व प्रकारच्या अभिषेकावर बंदी घालणेच योग्य ठरेल असं न्यायालयाने म्हटलं आहे. पारंपरेनुसार सर्व पूजा आणि अभिषेक हे शुद्ध गोष्टींचा वापर करुन केले जातात. पुजारी आणि पंडितांनी कोणत्याही भक्ताकडून शिवलिंगवर लेप किंवा दूध वगळता इतर गोष्टींचा अभिषेक केला जाणार नाही यासंदर्भातील खबरदारी घ्यावी. एखाद्या भक्ताला असं करताना पकडल्यास त्या भक्ताबरोबरच पुजारीही यासाठी दोषी ठरवले जातील असंही न्यायालयाने म्हटलं आहे. कोणत्याही भक्ताला शिवलिंग चोळता येणार नाही किंवा त्यावर दुधाशिवाय इतर गोष्टींचा समावेश असलेल्या द्रव्याने अभिषेक करता येणार नाही. मंदिर समितीकडून पारंपारिक पद्धतीने पूजा आणि अभिषेक केला जाईल. गर्भगृहातील पूजा स्थळावर सीसीटीव्ही कॅमेरांचे २४ तास लक्ष असेल. सहा महिन्यांपर्यंतची रेकॉर्डिंग जपून ठेवण्यात यावी. कोणत्याही पुजाऱ्याने या आदेशाचे उल्लंघन केलं तर मंदिर समिती त्या पुजाऱ्याविरुद्ध कारवाई करु शकते. मंदिर समितीकडूनच दुधाची व्यवस्था करण्यात येईल. दुधाचा दर्जा चांगला असावा यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश

न्यायालयाने उत्तराखंडमधील रुरकीमधील केंद्रीय इमारत संशोधन संस्थेला मंदिराच्या बांधणीसंदर्भातील आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिरापासून ५०० मीटरच्या अंतरावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. या प्रकरणामध्ये न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातील तज्ज्ञांच्या समितीकडून सल्ला मागवला होता. मंदिराचे बांधकामाबरोबरच शिवलिंगाची होणारी झिज कशी थांबवता येईल याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरले असं न्यायालयाने म्हटलं होतं. मंदिराच्या सध्याच्या वास्तूबद्दल मंदिर समितीमधील तज्ज्ञांच्या गटाने १५ डिसेंबर २०२० पर्यंत न्यायालयासमोर अहवाल सादर करावा असे आदेश न्या. मिश्रा यांनी दिले आहेत. मंदिरातील शिवलिंगाचे संरक्षण कशापद्धतीने करता येईल, मंदिराच्या बांधकामाची पडझड होणार नाही याबद्दल काय काळजी घेता येईल यासंदर्भातील सल्ला समितीने द्यावा असं न्यायलायने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 10:56 am

Web Title: do not rub shivalingam at ujjain mahakal temple directs supreme court scsg 91
Next Stories
1 भय इथले संपत नाही! करोना रुग्णसंख्येची पुन्हा उसळी; १,०५४ जणांचा मृत्यू
2 “गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांनी काँग्रेस सोडावा, भाजपात घेण्यास तयार आहोत”
3 करोनावर लस बनवण्यासाठी जगाला मदत नाही करणार – अमेरिका
Just Now!
X