लॉकडाउनंतर देशात आता बहुतेक सर्व गोष्टींचे व्यवहार सुरु झाले आहेत. दरम्यान, देशातील करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ आजाराला हलक्यात घेऊ नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील जनतेला केले. तसेच तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

भारतात चोवीस तासात आजपर्यंतचे सर्वाधिक ९६,००० नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४४ लाखांच्या पार पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने याबाबत माहिती दिली.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच म्हटलं आहे की, करोनाच्या संसर्गाचं आपल्यासमोर आणि संपूर्ण मानवजातीसाठी अभूतपूर्व आव्हान आहे. भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखील कोविड-१९ आजाराशी लढण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे. आपल्या या मेहनतीची संपूर्ण जगानं दखल घेतली आहे. त्याचबरोबर जोपर्यंत यावर लस येत नाही तोवर आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.