करोनासंदर्भात सामाजिक भेदभावाचे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी करोनाच्या रुग्णांचे नाव, त्यांची ओळख वा त्यांच्या निवासाचा परिसर तसेच, विलगीकरणातील लोकांची माहिती समाजमाध्यमांतून पसरवू नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. यासंदर्भात मंत्रालयाने बुधवारी निवेदन प्रसिद्ध केले असून कोणत्या बाबी केल्या पाहिजेत आणि कोणत्या टाळाव्यात याची माहितीही देण्यात आली आहे.

करोना महासाथीमुळे लोकांमध्ये भीती आणि अस्वस्थता असून उपचारांनंतर बरे झालेले तसेच, रुग्णांना सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांबाबत सामाजिक भेदभाव केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे करोनासंदर्भातील सामाजिक समज दूर करण्याची गरज असून त्याचा भाग म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सविस्तर निवेदन बुधवारी प्रसिद्ध केले.

रुग्णांची संख्या ५ हजार पार

गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ७७३ रुग्ण वाढले असून ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण करोना रुग्णांची संख्या ५,१९४ झाली असून एकूण मृत्यू १४९ इतके झाले आहेत. ४०२ रुग्णांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात १३,३४५ नमुना चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत १ लाख २१ हजार २७१ नमुना चाचण्या झाल्या आहेत. आयसीएमआरच्या १३९ आणि खासगी ६५ वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये नमुना चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत दोन कोटी नोंदणीकृत बांधकाम कर्मचाऱ्यांना ३ हजार कोटींचे वाटप करण्यात आले आहे. या लाभार्थीना एक ते सहा हजार रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले.

कोणत्या बाबी टाळाव्यात?

* रुग्ण, बरे झालेले रुग्ण, विलगीकरणातील लोक यांची माहिती समाजमाध्यमांवर देऊ नये.

* समाजात भीती व अशांतता निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये.

* आरोग्य सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती, वैद्यकीय सफाई कर्मचारी, पोलिसांवर हल्ला करू नये.

* करोनाच्या प्रादुर्भावाला कोणत्याही एक समाजाला वा परिसराला जबाबदार धरून लक्ष्य बनवू नये.

* करोनाच्या रुग्णांचा उल्लेख आपत्तीग्रस्त (व्हिक्टिम) असा न करता करोनाच्या आजारातून बरे होत असलेल्या व्यक्ती असा करावा.

काय करावे?

* जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणून त्यांना मदत करा.

* केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्धकेलेली अधिकृत माहितीच दुसऱ्याला पाठवा.

* समाजमाध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवण्याआधी ती सत्य असल्याची खात्री करून घ्या.

* करोनावरील उपचारांनंतर बरे झालेल्या रुग्णांसंदर्भातील सकारात्मक उदाहरणांची माहिती एकमेकांना द्या.