राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एका ओळीचं ट्विट करत सचिन पायलट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नाही अशी ओळ पोस्ट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र त्याचा पराभव करता येत नाही असा ओळीचा अर्थ होतो. राजस्थानमध्ये बंडखोरी केलेले सचिन पायलट आता नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा- “सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून रचलं होतं सरकार पाडण्याचं षडयंत्र”, गंभीर आरोप

राजस्थानात बंडाचा झेंडा फडकवून अशोक गेहलोत यांचं सरकार अडचणीत आणणारे सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला ज्यानंतर अवघ्या एका वाक्यात सचिन पायलट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- “गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर…”; उमा भारतींची तिखट प्रतिक्रिया

राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं. त्यामुळे हा करीश्मा घडवणाऱ्या सचिन पायलट यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली ती अशोक गेहलोत यांच्या गळ्यात. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. ज्यामुळे नाराज असलेल्या पायलट यांनी अखेर गेहलोत सरकारविरोधात बंड पुकारत २५ आमदारांना बाजूला काढलं आहे. गेहलोत सरकारकडे बहुमत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या बंडानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सचिन पायलट यांना काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं असल्याचं काही वेळापूर्वीच जाहीर केलं. ज्यानंतर अवघ्या एका ओळीत सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच सचिन पायलट यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता सचिन पायलट भाजपात जाणार की वेगळा पक्ष स्थापन करणार हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे.