पत्रकार गौरी लंकेश यांची तुलना कुत्र्यासोबत केल्याने श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. देशभरात त्यांच्या वक्तव्याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विचारवंतांच्या हत्यांबाबत का बोलत नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कर्नाटकात कुत्रा मेला तर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलणे आवश्यक आहे का? असा प्रश्न प्रमोद मुतालिक यांनी विचारला. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार नेटकऱ्यांनी तर घेतलाच पण काँग्रेसनेही हे वक्तव्य घृणास्पद असल्याचे म्हटले आहे.

कोण आहेत प्रमोद मुतालिक?
प्रमोद मुतालिक हे श्रीराम सेना या हिंदुत्त्ववादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. वयाच्या १३ व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या शाखेत जात होते. १९९६ मध्ये संघातील वरिष्ठांनी मुतालिक यांना बजरंग दलात सहभागी होण्यास सांगितले. बजरंग दलाचे दक्षिण भारत संयोजक पद मिळवण्यासाठी प्रमोद मुतालिक यांना वर्षभरापेक्षाही कमी कालावधी लागला. जहाल भाषा, आक्रमकता यासाठी प्रमोद मुतालिक ओळखले जातात. मागील २३ वर्षात प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर त्यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगातही जावे लागले.

मात्र अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करून त्यांना त्याचा राजकीय फायदा मिळाला नाही. २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून फारकत घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्त्ववाद पुढे करून हिंदूंची फसवणूक करतो आहे असा आरोप त्यांनी केला. २००७ मध्ये त्यांनी श्रीराम सेना स्थापन केली. हिंसा हाच या संघटनेचा मार्ग आहे असेही त्यांनी जाहीर केले. २००८ मध्ये प्रमोद मुतालिक यांनी राष्ट्रीय हिंदुत्त्व सेनेचीही स्थापना केली मात्र हा पक्ष निवडणूक लढवूनही आपले अस्तित्त्व सिद्ध करू शकला नाही.

आम्हाला यशस्वी होण्यासाठी पैसे, धर्म आणि टगेगिरी करणाऱ्यांची गरज आहे असे विधान कॅमेरासमोर केले होते. चित्रकार एम. एफ हुसैन यांच्या कथित वादग्रस्त चित्रांवर हल्ला चढवणारी संघटनाही श्रीराम सेनाच होती. आज हेच प्रमोद मुतालिक पुन्हा चर्चेत आले आहेत कारण त्यांनी पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.