नोएडा येथे ऑडी आणि ऑटो रिक्षाच्या अपघातात चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन संगणक अभियंत्यांचा समावेश आहे. ऑडीचा मालक हा एक न्यूरो सर्जन असून तो सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात न्यूरो सर्जन असणाऱ्या डॉ. मनिष रावत यांची भरधाव वेगाने जाणारी गाडी ऑटो रिक्षावर धडकल्यामुळे अपघात झाला. त्या अपघातामध्ये तीन अभियंते आणि रिक्षा चालक ठार झाला.

अपघातानंतर ऑडीमधून दोन जण बाहेर आले आणि त्यांनी तेथून पळ काढला असे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. ही कार स्वतः डॉक्टर रावत चालवत होते की नाही हे माहित नाही असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी डॉक्टरांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे. पोलीस रावत यांना शोधत आहेत.

पोलीस हे रावत यांच्या निवासस्थानी देखील जाऊन आले परंतु तेथे कुलुप असल्याचे दिसून आले. ३८ वर्षीय रिंकी यादव यांच्यासोबत त्यांचे दोन परिचित यजुवेंद्र सिंह आणि विशाल सिंह हे तिघे जण प्रवास करत होते. यजुवेंद्र आणि विशाल सिंह हे दोघे चुलतभाऊ होते. हे तिघेही व्यवसायाने संगणक अभियंते होते. विशाल सिंह या २५ वर्षीय तरुण नोएडामध्ये एका कंपनीसाठी मुलाखत देण्यास आला होता. विशाल सिंहचा नुकताच साखरपुडा झाला होता.

रिक्षा चालक संजीवला तीन वर्षांची मुलगी आहे आणि त्याची पत्नी ही सात महिन्यांची गरोदर आहे. रिक्षाच्या स्थितीकडे पाहूनच या अपघाताची तीव्रती कळते. रिक्षाला समोरुन धडक बसली त्यामुळे रिक्षातील सर्व प्रवासी ठार झाले. तर, ऑडीमधील एअरबॅग्ज उघडलेल्या स्थितीमध्ये होत्या त्यामुळे ऑडीत बसलेल्या व्यक्तींना काही झाले नसावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.