अमेरिकेतील नॉर्थ ह्यूस्टनमधील युनायटेड मेमोरियल येथे कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांवर उपचार करणारं एक छोटसं रुग्णालय आहे. या रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर म्हणजेच येथील चीफ ऑफ स्टाफ असणारे डॉ. जोसेफ व्हॅरॉन सध्या चर्चेत आहेत. डॉ. जोसेफ व्हॅरॉन यांनी थँक्स गिव्हींगच्या दिवशी रुग्णालयातील एका वयोवृद्ध रुग्णाला मारलेल्या मिठीचा फोटो सोशल नेटवर्कींगवर चांगलाच व्हायरल झाला होता. हा फोटो जोसेफ हे करोनाविरुद्धच्या लाढाईत लढताना थेट २५२ व्या दिवशी कामाला आले होते तेव्हाचा होता. जोसेफ यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एएफपी या वृत्तसंस्थेने त्यांच्याबद्दलची माहिती गोळा केली आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी रुग्णालयात पोहचले. जेव्हा एएफपीची टीम रुग्णालयात पोहचील तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण डॉ. जोसेफ हे सुट्टी न घेता त्या दिवशी सलग २६० व्या दिवशी रुग्णसेवेत व्यस्त होते. डॉ. जोसेफ यांनी रुग्णालयामधून आपण घरी गेल्यानंतरही आपला बराचसा वेळ हा फोनवर रुग्णांची बोलण्यात आणि इतर कामासंदर्भातील फोन कॉल्समध्येच जातो. रविवारपर्यंत त्यांनी सलग २६८ दिवस न सुट्टी घेता काम केल्याचं वृत्त द वॉशिंग्टन पोस्टने दिलं आहे. म्हणजेच आज, १४ डिसेंबर हा त्यांचा न सुट्टी घेता कामाचा २६९ वा दिवस ठरणार आहे.

नक्की पाहा >> डॉ. जोसेफ यांचा ‘हा’ हृदय पिळवटून टाकणारा फोटो जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

डॉ. जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना खाण्यापिण्यासाठीही पुरेसा वेळ नसतो. त्यामुळेच जेव्हा कोणी त्यांना काही खाण्याच्या पदार्थांची ऑफर करतं म्हणजे, खाण्याचे पदार्थ देतं तेव्हा ते त्याचा आनंदाने स्वीकार करतात. मिळेल ते मिळेल त्यावेळी खाल्ल्याने मागील काही काळामध्ये माझं वजन १५ किलोंनी वाढलं आहे, असं डॉ. जोसेफ हसतहसतच सांगतात.

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे डॉ. जोसेफ यांनी जुलै महिन्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, मी आणि माझे कर्मचारी सतत काम करुन खूप थकलो आहोत, असं म्हटलं होतं. रुग्णालयातील नर्सने एवढ्या वेळ काम केलं आहे की त्या पूर्णपणे थकल्या आहेत. त्या एवढ्या थकल्यात की आता त्यांना कोणत्याही क्षणी रडू येईल. करोना संसर्गाच्या कालावधीमध्ये स्वस्तात उपचार पुरवणाऱ्या या रुग्णालयामध्ये जेवढे रुग्ण दाखल झालेत सर्वांवर योग्य उपचार करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी न थकता दिवस रात्र काम केलं आहे. मात्र आता हे काम खूप जास्त प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांनाही थकवा आल्याचं डॉ. जोसेफ म्हणाले होते.

नक्की वाचा >> Coronavirus: “पुढील चार ते सहा महिने परिस्थिती…”; बिल गेट्स यांनी दिला इशारा

(फोटो सौजन्य : AP Photo/David J. Phillip)

जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टेक्सासमधील या रुग्णालयातील करोना विभागातील सर्व बेड भरलेले आहेत. रुग्णालयातील कर्मचारी करोनाच्या रुग्णाकडे विशेष लक्ष देत आहेत. डॉ. जोसेफही रोज करोना वॉर्डला भेट देतात. तेथील रुग्णांची तपासणी करतात. मात्र करोनावरील उपचारादरम्यान पीपीई कीट घालून या वॉर्डात जावं लागत असल्याने रुग्णांशी थेट संवाद होत नाही. त्यामुळेच डॉ. जोसेफ आणि त्यांच्या सहाकऱ्यांनी आपल्या पीपीई कीटवर स्वत:चे मोठे फोटो लावलेत. ज्यामुळे रुग्णांना आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर कसे दिसतात हे समजू शकते.