डॉक्टरला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. पण मध्य प्रदेशातील बुंदेलखंड मेडिकल कॉलेजात रविवारी एका महिला डॉक्टरने केलेल्या कृत्यामुळे माणुसकीला काळीमा फासला आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या एका लहान मुलीची प्रकृती खूप गंभीर होती. नातवेईक मुलीला वाचवण्यासाठी वारंवार महिला डॉक्टरकडे विनंती करत होते. यावेळी डॉक्टरने नातेवाईकांना एक कोटींच्या व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यास सांगितलं. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चिमुरडीचा मृत्यू झाला. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पेशंटच्या नातेवईंकांसोबत चुकीची वागणूक आणि कामात हलगर्जीपणा केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.

भोपाळपासून १८६ किमी दूर राहणाऱ्या एक वर्षीय अंशिका अहिरवार अंगावर गरम पाणी पडल्याने ७० टक्के जळाली होती. प्रकृती गंभीर असल्याने तिला बुंदेलखंड मेडिकल कॉलेजात भर्ती करण्यात आलं होतं.

मुलीचे काका बिजेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डॉक्टर मुलीवर उपचार करत नव्हते. मुलीला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास ते सांगत होते. महिला डॉक्टर ज्योती राऊत आमच्याकडे आल्या आणि मुलीला व्हेंटिलेटरची गरज असून रुग्णालयातील व्हेंटिलेटर खराब झालं असल्याचं सांगितलं. रुग्णालयात व्हेंटिलेटर नसून जर मुलीवर उपचार करायचे असतील तर व्हेंटिलेटरची व्यवस्था करा असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर आणि रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे मुलीचा मृत्यू झाला. यानंतर आम्ही रुग्णालय प्रशासनाकडे यासंबंधी तक्रार केली’.

डॉक्टर ज्योती राऊत यांनी आरोप चुकीचे असून व्हिडीओ क्लीप एडिट करण्यात आल्याचा दावा केला आहे. संपूर्ण बोलणं व्हिडीओत दाखवण्यात आलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मला मुलीच्या नातेवाईकांनी घेरलं होतं आणि दबाव आणत होते. रुग्णालयात कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नाही. मी सुरुवातीपासून मुलीवर उपचार करत होते आणि तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं आहे.

मेडिकल कॉलेजचे डीन डॉ जी एस पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मेडिकल कॉलेजमध्ये एकूण १७ व्हेंटिलेटर असून बर्न वॉर्डमध्ये एकही व्हेंटिलेटर नाही. डॉक्टरचं वागणं चुकीचं होतं त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे’. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली आहे. समिती दोन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.