भारतात आजपासून करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशाच्या वेगवेगळया भागात हे लसीकरण सुरु आहे. सर्वप्रथम करोना योद्धे आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीचे डोस दिले जात आहेत. कारण प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असल्यामुळे या गटाला करोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे.

भारतात सध्या सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादन केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. त्यात भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ स्वदेशी करोना प्रतिबंधक लस आहे, तर ‘कोव्हिशिल्ड’ ही ऑक्सफर्डने विकसित केलेली लस आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट या लसीचे उत्पादन करतेय. काही दिवसांपूर्वी ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींच्या परिणामकारकतेवरुन दोन कंपन्यांच्या प्रमुखांमध्येच वाद झाला होता.

आता दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचून घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहून आम्हाला भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस नकोय, त्याऐवजी आम्हाला सिरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस चालेलं असे म्हटले आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या मनात चिंता आहे, असे आरएमएल रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले. ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच वापरासाठी मान्यता दिली आहे. सध्या भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत.