बिहारच्या दरभंगामधील एका मोठया सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी अक्षरक्ष: कहर केला आहे. डॉक्टरांचे दुर्लक्ष,गलथानपणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दरभंगाच्या मेडीकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सोमवारी फैझान नावाच्या एका मुलाला आणण्यात आले होते.

झाडावरुन खाली पडल्यामुळे फैझानचे डाव्या हाताचे हाड मोडले होते. त्याला तात्काळ उपचाराची आवश्यकता होती. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये डयुटीवर असलेल्या डॉक्टरने फैझानच्या डाव्या हाताऐवजी उजव्या हाताला प्लास्टर घातले.

एक्स रे रिपोर्टमध्ये मुलाचा डावा हात फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट दिसत होते. तरीही डॉक्टरने उजव्या हाताला प्लास्टर घातले. डॉक्टर प्लास्टर घालत असताना फैझान त्यांना तुम्ही चुकीच्या ठिकाणी उपचार करत आहात हे सांगत होता. पण डॉक्टरांनी त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर सुद्धा डाव हात फ्रॅक्चर असल्याचे म्हटले होते.

या प्रकारानंतर फैझानच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावेळी त्यांनी चूक झाल्याचे कबुल केले. त्यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारुन फैझानच्या उपचारामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. हॉस्पिटलने जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.