सेवेत रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील कनिष्ठ डॉक्टरांना दुपापर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही बॅनर्जी यांनी दिला आहे. राज्यात सुरू असलेली निदर्शने हा आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्याचा डाव आहे, या निदर्शनांचा आपण निषेध करतो, कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेला संप हा माकप आणि भाजपचा कट आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांमधील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली असल्याच्या पाश्र्वभूमीवर ममता बॅनर्जी दुपारी १२.१० वाजता एसएसकेएम रुग्णालयात पोहोचल्या. रुग्ण वगळता अन्य कोणालाही रुग्णालयाच्या संकुलात प्रवेश न देण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.

एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन सहकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला, त्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. बाहेरील लोक रुग्णालयांमध्ये घुसत असून गोंधळ घालत आहेत आणि भाजप संपाला जातीय रंग देत आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. माकपच्या सहकार्याने भाजप हिंदी-मुस्लीम राजकारण करीत आहे, त्यांचे हे प्रेम पाहून आपल्याला धक्का बसला आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जातीय तणाव निर्माण करण्यास खतपाणी घालत आहेत आणि फेसबुकवर अपप्रचार करीत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

‘ममतांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा’

संपकरी डॉक्टरांना धमकी दिल्याबद्दल पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली असून ममता यांनी आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. प्रश्न सोडविण्याऐवजी ममता बॅनर्जी दूषणे देण्यातच मश्गूल आहेत, असे पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश मुझुमदार यांनी म्हटले आहे. संपकरी डॉक्टरांशी चर्चा करण्याची ही पद्धत आहे का, त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्या डॉक्टर, भाजप आणि इतरांना दोष देत आहेत, असे ते म्हणाले.

मागण्या पूर्ण होईपर्यंत संपाचा निर्धार

संपकरी कनिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आदेश धुडकावला असून शासकीय रुग्णालयातील सुरक्षाविषयक मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.आमच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, आम्ही राज्यपालांशी चर्चा केली आहे, आमच्या मागण्या साध्या आहेत, सर्व रुग्णालयांमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवावा, एनआरएस येथे डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला, त्या आरोपींना अजामीनपात्र तरतुदींनुसार अटक करावी, असे एका संपकरी डॉक्टराने सांगितले.