राजस्थानातील एका सरकारी रुग्णालयातल्या प्रसूती कक्षात गायत्री मंत्राच्या जपाला मुस्लीम महिलांनी विरोध केला आहे. गर्भवती महिलांच्या प्रसूती वेदना कमी व्हाव्यात यासाठी गायत्री मंत्र ऐकवला जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, यावर मुस्लिम महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. नवजात मुलांच्या कानात प्रथमतः आजानाचाच आवाज जायला हवा असे त्यांचे म्हणणे आहे. सवाई माधवपूर शहरातील रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

सवाई माधवपूरचे मुख्य तपासणी आणि वैद्यकीय अधिकारी तेजराम मीणा यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात गायत्री मंत्राचा जप केला जातो. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर २० रुग्णालयांमध्येही हा प्रयोग सुरु करण्यात येणार आहे. गर्भवती महिलांना गायत्री मंत्र ऐकल्यानंतर त्यांना कमी त्रास व्हावा यासाठी हे केले जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, मुख्य वैद्यकीय अधिकारी ग्रोवर यांनी सांगितले की, प्रसुती कक्षात गायत्री मंत्राचा जप एक वर्षापासून सुरु आहे. आता सर्वच सरकारी मेडिकल कॉलेजेस आणि प्रसूती कक्षांमध्ये गायत्री मंत्राचा जप करण्याचा विचार सुरु आहे.

तर विशेष सचिव डॉ. समित शर्मा यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून अशा प्रकारे गायत्री मंत्राचा जप करण्याचे कुठलेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. केवळ मानसीक तणावापासून दूर राहण्यासाठी ध्यानासंबंधी धून वाजवण्यास रुग्णालयांना सांगण्यात आले आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे अशा प्रकारे जर कुठल्या रुग्णालयांमध्ये गायत्री मंत्राची सक्ती करण्यात येत असेल तर संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येईल.