कृष्ण कौशिक, मनोज सी जी

चीनने पूर्व लडाखमध्ये भारतीय भूप्रदेशात ‘अतिक्रमण’ केल्याची कबुली संरक्षण मंत्रालयाच्या एका दस्तऐवजात देण्यात आली होती. मात्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील हा दस्तऐवज दुसऱ्याच दिवशी तेथून नाहीसा झाला आहे.

जूनमधील ‘संरक्षण विभागाची महत्त्वाची कामगिरी’ असे नमूद केलेल्या या दस्तऐवजात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये सुरू असलेल्या ‘दीर्घकालीन’ तिढय़ाचा इशारा देण्यात आला होता. विशेष म्हणजे यापूर्वी एप्रिल आणि मेच्या अहवालात संरक्षण मंत्रालयाने चिनी आक्रमणाचा उल्लेख केला नव्हता.

या दस्तऐवजातील उल्लेखाच्या आधारेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘खोटारडेपणाचा’ आरोप केला. हा दस्तऐवज आता संकेतस्थळावर दिसत नसल्याने, त्यांनी संकेतस्थळावरून दस्तऐवज काढल्याबद्दल सरकारवर टीका केली. कुणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही, असे सरकारने १९ जुलैला बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते.

हा दस्तऐवज मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून का काढून टाकण्यात आला, याबद्दल प्रतिक्रियेसाठी संरक्षण खात्याशी संपर्क साधला असता, प्रवक्त्याने काहीही बोलण्यास नकार दिला.

मोदींकडून भारतीय जवानांचा अपमान – राहुल गांधी

पाटणा: चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केले नव्हते असे ‘असत्य’ बोलून त्यांनी पूर्व लडाखमध्ये शत्रूशी लढताना जीव गमावलेल्या भारतीय जवानांचा ‘अपमान’ केला, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी आभासी सभेत पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल यांनी मोदी सरकार रा.स्व. संघाच्या संगनमताने सर्व संस्था नष्ट करत असल्याचा आरोप केला. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी काँग्रेसने स्वत:च्या खांद्यावर घ्यायला हवी, असे ते म्हणाले.

‘त्या’ दस्तऐवजात नेमके काय?

* पूर्व लडाखमधील परिस्थिती चीनच्या आक्रमकतेमुळे दिवसेंदिवस संवेदनशील बनत आहे.

* तेथील परिस्थितीवर बारीक देखरेख ठेवण्याची आणि तातडीने कृतीची आवश्यकता आहे.

* प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर विशेषत: गलवान खोऱ्यात ५ मे २०२०पासून चीन आक्रमक झाला आहे.

* चिनी सैनिकांनी कुगरँग नाला, गोग्रा, आणि पँगाँग सरोवर या भागांमध्ये १७-१८ मे २०२० रोजी अतिक्रमण केले आहे.