विजयादशमीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज ज्योतिर्मठ येथील इंडो-तिबेटियन सीमा पोलिस (आयटीबीपी)च्या मुख्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी या जवानांशी संवाद साधत त्यांच्यासोबत विजयादशमीचा सण साजरा केला.


जवानांशी संवाद साधताना राजनाथ म्हणाले, डोकलाम येथे सध्या तणावाची परिस्थिती असली तरी चर्चेद्वारे यावर आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. तोडग्यासाठी भारत आणि चीन दोन्हीही देश सकारात्मक आहेत. भविष्यात अशी वेळ येईल जेव्हा हा सीमावाद आपण मुद्देसुद चर्चेद्वारे पूर्णपणे सोडवलेला असेल, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी राजनाथ यांनी भारत-चीन सीमेवरील रिमखिम पोस्ट येथे जाऊनही आयटीबीपीच्या सीमेवर तैनात जवानांना भेट दिली. यावेळी ते म्हणाले, जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुम्हाला भारताच्या सीमांचे रक्षण करण्यापासून रोखू शकते.

दरम्यान, जोतिर्मठ येथील आयटीबीपीच्या मुख्यालयातील भेटीदरम्यान, रक्तदान करणाऱ्या जवानांच्या कँपलाही त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले.