भारत आणि चीन यांच्यात डोकलाम परिसरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून भारताची प्रशंसा करण्यात आली आहे. या संपूर्ण वादात भारत एखाद्या परिपक्व सत्तेप्रमाणे वागत आहे. याउलट चीनचे वर्तन हे लहान मुलासारखे असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. भारताने आतापर्यंत योग्य निर्णय घेतले आहेत. त्यांनी आतापर्यंत या वादातून माघारही घेतलेली नाही किंवा चीनच्या आरोपांना उत्तर देण्याच्या फंदातही पडलेला नाही. हे एखाद्या परिपक्व सत्तेचे लक्षण आहे. याउलट चीन रागाच्या भरात एखाद्या लहान मुलाप्रमाणे चुका करत असल्याचे अमेरिकन नौदल प्रशिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापक जेम्स होल्मस यांनी सांगितले.

दरम्यान, चीनच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भारतीय सैन्याकडून अरूणाचल प्रदेशमधील तुकड्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसरातील तुकड्या नेहमीपेक्षा सीमेपासून जवळच्या अंतरावर ठेवण्यात आल्या आहेत. डिमापूर मुख्यालयातील ३ कॉर्प्स आणि तेझपूर येथील ४ कॉर्प्सची तुकडीला हाय अलर्टच्या स्थितीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आतापर्यंत चीनकडून या भागात कोणतीही मोठी लष्करी हालचाल दिसून आलेली नाही.

सिक्कीममधल्या डोकलामवरून सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशांचे परस्पर संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत. चीन एकीकडे युद्धाची धमकी देत असतानाच हा प्रश्न दोन्ही देशांनी चर्चा करून सोडवावा असं अमेरिकेने यापूर्वीच म्हटले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हेदर नोर्ट यांनी अमेरिकेत झालेल्या पत्रकारांच्या संमेलनात ही प्रतिक्रिया दिली होती. अमेरिकेचे संबंध दोन्ही देशांसोबत आहेत, त्यामुळे डोकलामप्रश्नी जा काही तणाव चीन आणि भारतात सुरू आहे त्यावर आमची नजर आहे. दोन्ही देशांनी डोकलामचा सीमा प्रश्न आपसात चर्चा करून सोडवावा असाही सल्ला नोर्ट यांनी दिला होता. याआधी अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा आणि अमेरिकेचे इलिनोईचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी डोकलाम वादासाठी चीन जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते.