एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानांची देशांतर्गत सेवा उद्यापासून सुरू होत आहे. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणे २२ मेपासून सुरू होतील. या वित्तीय वर्षांत एअर इंडिया खर्चात दोन हजार कोटी रुपयांची कपात करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
ड्रीमलाइनरचे पहिले विमान दिल्लीहून कोलकत्याला रवाना होईल. बॅटरीला आग लागण्याच्या घटनेनंतर याच्या दोन विमानांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ड्रीमलाइनरचे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण २२ मे रोजी दिल्लीहून बर्मिगहॅमला होईल. तर ऑगस्टपासून सिडनी-मेलबोर्न तर ऑक्टोबरपासून रोम आणि मिलानला याची नियमित उड्डाणे सुरू होतील. पुढच्या वर्षी मॉस्कोला ड्रीमलाइनरची सेवा सुरू होईल असे नागरी उड्डयन मंत्री अजित सिंह यांनी सांगितले.
सहापैकी चार ड्रीमलाइनर या महिनाअखेरीस कार्यरत होतील, याखेरीज बोइंगकडून डिसेंबपर्यंत आणखी ८ विमाने मिळणार आहेत. त्यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात १४ ड्रीमलाइनर असतील. जानेवारी १७ पासून बी-७८७ या विमानांनी उड्डाण केलेले नाही. बोस्टन आणि जपानमध्ये बॅटरीला आग लागण्याच्या घटनांमुळे या विमानांची उड्डाणे बंद होती. त्यामुळे अमेरिकास्थित विमाने तयार करणाऱ्या या कंपनीने एअर इंडियाला किती नुकसानभरपाई दिली हे सांगण्यास अजित सिंह यांनी नकार दिला.