करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र या काळात अनेक उद्योगधंदे, दुकानं बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत सरकारने करोनाचा प्रभाव कमी असलेल्या काही भागांमध्ये उद्योगधंदे सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या लॉकडाउनचा फटका देशातील कामगारांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. नवी दिल्लीत उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांचा रोजगारही या लॉकडाउन काळात तुटला आहे. अनेक महिलांवर सध्या परिस्थितीमुळे भीक मागण्याची वेळ आलेली आहे.

३२ वर्षीय अंजु बिबी या महिलेने जास्त पगार मिळेल या आशेने नोएडा सेक्टर ५० मधलं आपलं काम सोडून नवीन काम स्विकारलं. मात्र लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांमध्येच तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं. “लॉकडाउन जाहीर झालं आणि १५ दिवसांनी माझ्या हातात १६०० रुपये देत, मला नोकरी सोडायला सांगण्यात आलं. आता कोणीही आम्हाला काम देत नाहीये. परत आम्ही कधी कामावर जाऊ हे देखील कोणीही सांगत नाहीये.” अंजु बिबी इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होती. सर्फाबाद गावातील सेक्टर ७५ मध्ये अंजु बिबी आणि तिच्यासारख्या घरकाम करणाऱ्या अनेक महिला राहतात. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर, बहुतांश महिला आपल्या पश्चिम बंगाल येथील गावात परत गेल्या आहेत.

मात्र ज्या महिला अजुनही कामाच्या अपेक्षेने थांबून आहेत त्यांचा संघर्ष काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. ३१ वर्षीय रहिला परवीनची कहाणीही काही अशीच आहे. “मी एका घरात मार्च महिन्यापासून काम करतेय, त्यांनी मला ५ हजार रुपये देणं बाकी आहे. ते मला पेटीएमवरही पैसे पाठवू शकतात असं मी त्यांना सांगितलं, पण तरीही ते माझा फोन उचलतच नाहीत. काहीवेळा तर फोन स्विचऑफ केलेला असतो. सोसायट्यांमध्ये आम्हाला प्रवेश दिला जात नाही. काही ठिकाणी प्रवेश दिला तर एकापेक्षा जास्त घरात काम करण्याची परवानगी मिळत नाही. काही जणांनी मला फोन करुन गावाला परत जा असा सल्ला दिला. पण आता मी गावाला गेले तर परत कधीच दिल्लीत येऊ शकणार नाही. आमच्यापैकी काही जणींनी रोजच्या जेवणासाठी भीक मागायला सुरुवात केली आहे.”

आतापर्यंत ज्या घरात आपण काम केलं त्या घरातून पुन्हा फोन येईल अशी आशा या महिलांच्या मनात आहे. काही काम मिळावं या आशेने अनेक महिला नोएडा परिसरातील सोसायट्यांच्या गेटबाहेर उभ्या असतात. अनेक घरांनी या महिलांचा पगारही थकवला आहे, त्यामुळे हक्काचे पैसे घेतल्याशिवाय आपण कुठेही जाणार नसल्याचं मत काही महिलांनी व्यक्त केलं.