जगभरातील अनेक देश करोना लसीसाठी आता भारताकडे मदत मागत आहे. भारताकडे मदत मागणाऱ्या या देशांच्या यादीमध्ये आता डॉमनिकन रिपब्लिकच्या नावाचाही समावेश झाला आहे. डॉमनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कैरिट यांनी भारताने करोना लसीचे ७० हजार डोस मदत म्हणून पाठवावेत अशी मागणी करणारं पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. बुधवारी भूटान आणि मालदीव या आपल्या शेजारी देशांना भारताने भेट स्वरुपात करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. त्याच दिवशी डॉमनिकन रिपब्लिकच्या पंतप्रधानांनी हे पत्र पाठवलं आहे हे विशेष. भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

नक्की वाचा >> गांजा वाचवू शकतो करोना रुग्णांचे प्राण; संशोधकांचा दावा

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार डॉमनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान स्कैरिट यांनी, “जगाने २०२१ मध्ये प्रवेश केल्यानंतरही आपल्या सर्वांची कोविड-१९ विरोधातील लढाई सुरु आहे. डॉमनिकमधील ७२ हजार लोकसंख्येला ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीची खूप गरज आहे. यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की आमच्या देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या गरजेनुसार करोना लसीचे डोस मदत म्हणून पाठवून आम्हाला सहकार्य करावे,” असं पत्रात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> भारतातील करोना लसीकरणात कंडोम बनवणारी कंपनी बजावणार महत्त्वाची भूमिका

“सध्या करोनाची लस मिळवण्याची जागतिक स्तरावर जी स्पर्धा सुरु आहे त्याच पार्श्वभूमीवर मी तुम्हाला आमच्या देशातील जनतेसमोरील समस्यांबद्दल सांगू इच्छितो. निर्माण करण्यात येणाऱ्या करोना लसींपैकी अर्ध्या लसी देशातील विकसनशील देशांना देण्याचा शब्द ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनने दिला असला तरी आमच्या देशातील लोकांना ही लस एवढ्या मिळणार नाही असं चित्र दिसत आहे. आमचा देश हा एक छोटसं बेट असून तो विकसनशील देशांपैकी एक आहे. करोना लसींसाठी सध्या जगभरामध्ये स्पर्धा सुरु असून या मोठ्या देशांच्या करोना लस मिळवण्याच्या स्पर्धेत आम्ही टीकणार नाही. त्यामुळेच भारताने आम्हाला मदत करावी,” अशा शब्दांमध्ये स्कैरिट यांनी भारतीय पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे.

नक्की वाचा >> करोना कर्फ्यूत कुत्र्याला फिरण्यास परवानगी असल्याने तिने पतीच्याच गळ्यात घातला कुत्र्याचा पट्ट अन्…

डॉमनिकन रिपब्लिकचे भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जम्मू काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर चीन पाकिस्तानचे समर्थन करत असतानाच कॅरेबियन बेट समुहांमध्ये असणाऱ्या या छोट्याश्या देशाने भारताची बाजू घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक स्तरावरील जबाबदारी ओळखून भारत अनेक देशांना करोना लसीसाठी मदत करणार असल्याची घोषणा आधीच केली आहे.