देशातील टाळेबंदी संपली असली तरी, करोनाचे संकट गेलेले नाही. ही वेळ बेफिकीर होण्याची नाही. करोना गेला, करोनाचा धोका संपला असे मानू नका, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरचित्रसंवादाद्वारे देशाला उद्देशून केलेल्या भाषणात दिला.

नवरात्रोत्सव साजरा केला जात असून त्यानंतर दसरा आणि दिवाळी असेल. सणासुदीचे दिवस सुरू झाले असून या उत्सवांच्या काळात देशवासींनी स्वत:चे आरोग्य सांभाळावे व सणांचा आनंद लुटावा अशा शुभेच्छाही मोदींनी दिल्या. मात्र, सणासुदींमध्ये करोनाकडे किंचितदेखील दुर्लक्ष न करण्याचे आवाहन मोदींनी केले. टाळेबंदी लागू झाल्यानंतर मोदींनी देशवासींना उद्देशून केलेले हे सातवे भाषण होते.

देशभर बाजारांमध्ये लोकांची गर्दी होऊ लागली असून करोनासंदर्भातील नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून सप्टेंबरच्या मध्यातील उच्चांकापासून आता परिस्थिती निवळू लागली आहे. मात्र, लोकांनी करोनाबाबत बेफिकिरी दाखवली तर करोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा झपाटय़ाने वाढ होण्याचा धोका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मोदींनी लोकांना सावधगिरीचा इशारा देत आवाहनही केले.

मोदी म्हणाले की, करोनाविरोधातील लढय़ात जनता संचारबंदीपासून आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे. आता आर्थिक घडामोडींनाही वेग आला आहे. उदरनिर्वाहासाठी लोक घरातून बाहेर पडू लागले आहेत. आता सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. या दिवसांत बाजारात गर्दी पाहायला मिळते. बाजार उजळून निघाले आहेत. पण लक्षात असू द्या की, करोनाशी सुरू असलेली लढाई कायम आहे. गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये प्रत्येक नागरिकाने केलेल्या प्रयत्नांमुळे भारत करोनाच्या आपत्तीतून सावरू लागला आहे. आटोक्यात येत असलेली परिस्थिती बिघडू देऊ नका.

त्यांनी पुढे सांगितले की, अनेक चित्रफिती तुम्ही पाहिल्या असतील ज्यामध्ये लोक करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अनेकांनी सावध राहणे सोडून दिले आहे. ते बेफिकीर झालेले दिसतात. मुखकवच न घालत फिरताना दिसतात. असे करून तुम्ही स्वत:ला, तुमच्या कुटुंबाला, लहान मुलांना, वयस्क लोकांना संकटात टाकत आहात, हे लक्षात घ्या.

अमेरिका, युरोपमधील देशांमध्ये लोक बेफिकीर झाले. या देशांमध्ये करोनाचे रुग्ण कमी झाले होते पण, आता ते अचानक वाढलेले दिसतात. तिथे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. लस येत नाही तोपर्यंत यत्किंचितही इच्छाशक्ती कमकुवत होऊ देऊ नका, असे आवाहन मोदी यांनी केले.

कबीर, रामचरितमानस..

लोकांना दक्ष राहण्याचा सल्ला देताना मोदींनी रामचरितमानस आणि कबिराची शिकवण दिली. शेतातील उभे पीक बघून शेतकरी हरखून जातो पण, त्याला माहिती असते की धान्य घरी पोहोचत नाही तोपर्यंत काम पूर्ण होत नाही. त्यामुळे करोनाच्या लढय़ात पूर्णपणे यश मिळत नाही तोपर्यंत बेफिकिरी करू नका. कबिराची शिकवण लक्षात ठेवा. रामचरितमानसमध्येही अनेक धोक्याचे इशारे दिले आहेत. आग, शत्रू, चुका, आजार यांना कधीही छोटे समजू नका. पूर्ण उपचार होत नाहीत तोपर्यंत करोनाकडे दुर्लक्ष करू नका, असे मोदी म्हणाले.

करोनाप्रतिबंधक प्रयत्नांना मोठे यश

* पंतप्रधान म्हणाले की, भारतात करोनामुक्तीचे प्रमाण चांगले आहे. मृत्युदर जगभरात सर्वात कमी आहे. १० लाख लोकसंख्येमागे देशात ८३ मृत्यू झाले, हे प्रमाण अमेरिका आणि अन्य देशांमध्ये ६०० हून अधिक आहे. सधन देशांपेक्षा भारतात कमी मृत्यू झाले हे आपले मोठे यश आहे.

* देशात करोना रुग्णांसाठी ९० लाख खाटांची सुविधा, १२ हजार करोना आरोग्यसेवा केंद्रे आहेत. २ हजार वैद्यकीय प्रयोगशाळा आहेत. नमुना चाचण्यांचा १० कोटींचा टप्पाही पार केला जाईल. चाचण्यांमध्ये झालेली दैनंदिन वाढ ही देशाची मोठी ताकद आहे. डॉक्टर, आरोग्यसेवक, सुरक्षारक्षक नि:स्वार्थ सेवा देत आहेत. त्यांचे प्रयत्न वाया जाणार नाहीत याची काळजी घ्या.

*  लस उपलब्ध झाली की प्रत्येक नागरिकापर्यंत ती पोहोचवली जाईल. त्यासाठी सरकार तयारी करत आहे.

दवाई नही, ढिलाई नही!

सणासुदीचे दिवस हे आनंदाचे दिवस असतात. पण सध्या आपण सगळेच कठीण परिस्थितीतून पुढे जात आहोत. आपल्याला मी सुरक्षित पाहू इच्छितो. सण तुमच्यामध्ये उत्साह निर्माण करो. तुम्हा सगळ्यांचे आरोग्य चांगले राहो. तुम्ही वेगाने पुढे जा, देशालाही पुढे घेऊन जा. नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छट पूजा, गुरुनानक जयंतीसह सर्व सणांच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पण, काळजी घ्या. अंतर राखा, साबणाने हात धूत राहा, मुखकवच वापरा. प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांमधून अधिकाधिक जनजागृती करा.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान