पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच तेथील राजकीय वातावरण गरम व्हायला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. भाजपा व टीएमसीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर, लव्ह जिहादच्या मुद्यावरून देखील आता वाद सुरू झाला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी आज पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत या संदर्भात भूमिका मांडली.

”प्रेम अतिशय वैयक्तिक बाब आहे. लव्ह आणि जिहाद हातात हात घालून नाही चालू शकत. निवडणुकांच्या बरोबर अगोदर लोकं अशा प्रकारचे विषयांना घेऊन समोर येतात. तुम्ही कोणाबरोबर राहू इच्छिता ही एक वैयक्तिक निवड आहे. प्रेमात रहा आणि एकमेकांच्या प्रेमात पडणं सुरू करा. धर्माला राजकाराणाचं हत्यार बनवू नका.” असं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाने लव्ह जिहादचा मुद्दा उचलून धरलेला आहे. देशभरातील भाजपाशासीत राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्वतः भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे.