डोनाल्ड ट्रम्प यांची भारताकडे मागणी

वॉशिंग्टन/ओसाका : अमेरिकेतून येणाऱ्या मालावर भारताकडून वाढविण्यात आलेले आयात शुल्क आपल्याला अमान्य असल्याचे स्पष्ट करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ते मागे घेण्याची मागणी गुरुवारी केली.

जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून वाढता जागतिक व्यापार संघर्ष या विषयावर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘अमेरिका फर्स्ट’ ही ट्रम्प यांची भूमिका असून अमेरिकेच्या उत्पादनांवर भारताने लावलेल्या आयात शुल्कावर त्यांनी यापूर्वीही जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर ट्रम्प यांनी भारताला  ‘टॅरिफ किंग’ असेही संबोधले आहे.

ट्रम्प आणि मोदी यांच्यात शुक्रवारी चर्चा होणार आहे, मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळविल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रथमच चर्चा होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पेओ यांनी मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबत ट्वीट केले.

यापूर्वी ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसन दुचाकींवर लावण्यात येणाऱ्या १०० टक्के कराबाबत भाष्य केले होते. ट्रम्प सातत्याने हा मुद्दा उपस्थित करीत आहेत कारण अमेरिकेला भारताकडून त्यावर अनुकूल निर्णय हवा आहे. तर भारताने अमेरिकेतून येणारे बदाम, सफरचंद आणि अक्रोड यासह २० वस्तूंवरील आयात शुल्क वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयामागे रणनीतीच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे भारतीय अधिकाऱ्यांना वाटत आहे.

आयात शुल्क तर्कसंगत असण्यासाठीची यंत्रणा असावी असा निर्णय दोन्ही बाजू घेतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत अमेरिकी उत्पादनांवर अधिक कर लादत आहे, या करांमध्ये अलीकडेच वाढ करण्यात आली आहे. हे आम्हाला मान्य नसून ही वाढ मागे घेतलीच पाहिजे. या विषयावर मोदी यांच्याशी चर्चा करण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.

– डोनाल्ड ट्रम्प