अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पुढच्या प्राथमिक लढतींच्या पाश्र्वभूमीवर काही भारतीय वंशाच्या अमेरिकी व्यक्तींनी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पािठंबा दिला आहे. बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्याबाबत ट्रम्प यांनी व्यक्त केलेली मते आम्हाला मान्य आहेत. उलट त्यामुळे भारताचा फायदा होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार काही स्थलांतरित गटांनी ट्रम्प यांना त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करूनही पाठिंबा दिला आहे. मेक्सिकोतून आलेले लोक बलात्कारी व अमली पदार्थ तस्कर आहेत, अमेरिकेत येणाऱ्या मुस्लिमांवर तूर्त बंदी घालायला हवी असे सांगून ट्रम्प यांनी १.१० कोटी बेकायदेशीर स्थलांतरितांना हाकलण्याची मागणी केली होती. भारतीय अमेरिकी वकील आनंद आहुजा हे भारतीय अमेरिकी व्यक्तींच्या ट्रम्प समर्थक गटाचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांना आमचा पाठिंबा आहे. बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचे त्यांनी केलेले आवाहन चुकीचे नाही. जे लोक कायदा मोडतात त्यांचा गौरव करणे योग्य नाही, कायदा मोडला तर शिक्षा झाली पाहिजे एवढेच ट्रम्प म्हणाले त्यात काही चुकीचे नाही. आदिती शर्मा या विद्यार्थिनीने फेसबुकवर ट्रम्पसमर्थक गट चालवला आहे तिने सांगितले की, ट्रम्प हे वेगळे उमेदवार आहेत. मुस्लीम निर्वासितांवर बंदीचे मी समर्थनच करते. असे असले तरी या भारतीय अमेरिकी गटांचे मत म्हणजे तेथील भारतीय वंशाच्या समुदायाचे मत नाही. पेनसिल्वानिया विद्यापीठातील सेंटर फॉर अॅडव्हान्सड स्टडी ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक देवेश कपूर यांनी सांगितले की, याआधी आहुजा यांच्या गटाने डेमोक्रॅटिक पक्षाची पाठराखण केली होती. २००८ च्या निवडणुकीत भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी ८४ टक्के मते बराक ओबामा यांना मिळाली होती.