अमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी काँग्रेसच्या समित्यांतील नऊ अध्यक्षांनी पाठिंबा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षीय उमेदवारी मिळाल्यासारखीच असताना त्यांना पक्षातून विरोध होण्याची शक्यता अमेरिकी काँग्रेसचे सभापती रायन यांच्या विरोधामुळे व्यक्त केली गेली होती.
अमेरिकी काँग्रेसच्या नऊ समित्यांच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, आम्ही एका ऐतिहासिक निवडणुकीच्या तोंडावर आहोत. हा महान देश आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात जाऊन उपयोगाचे नाही. अमेरिकी काँग्रेसची सूत्रे डेमोक्रॅटसच्या ताब्यात जाता कामा नयेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. अमेरिकी प्रतिनिधिगृह व अमेरिकी सिनेट यात रिपब्लिकनांचे वर्चस्व असले पाहिजे. ज्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे त्यात स्टीव्ह श्ॉबॉट (लघुउद्योग), मायकेल कॉनवे ( कृषी), जेब हेनसार्लिग (अर्थसेवा) कॅनडाइस मिलर ( सभागृह प्रशासन), जेफ मीलर ( ज्येष्ठ नागरिक कामकाज), टॉम प्राइस (अर्थसंकल्प), पीट सेशन्स (नियम), बिल शुस्टर ( वाहतूक व पायाभूत सुविधा), लॅमर स्मिथ (विज्ञान, अवकाश व तंत्रज्ञान) या समित्यांनिहाय अध्यक्षांचा समावेश आहे. रिपब्लिकन पक्षाचा विजय झाला नाही तर ते देशाच्या सुरक्षेला घातक असेल. ओबामा केअर कायदा धोकादायक आहे. अमेरिकेत दारिद्रय़ाच्या चक्रामुळे प्रजासत्ताकाला धोका निर्माण झाला आहे. देशात नोव्हेंबरमध्ये निवडणुकीत जिंकायचे असेल तर एकी आवश्यक आहे. त्यासाठी ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत. अमेरिकेतील प्रश्न सोडवण्यासाठी रिपब्लिकनांचे बहुमत आवश्यक आहे. दरम्यान ट्रम्प यांनी सांगितले की, प्रचारासाठी कर्जाने दिलेले ५ कोटी डॉलर्स परत घेण्याचा विचार नाही. हा निधी मेक अमेरिका ग्रेट अगेन मोहिमेसाठी दिला असल्याचे समजा असे त्यांनी एमएसएनबीसी वाहिनीला सांगितले. द न्यूयॉर्क टाइम्सने ट्रम्प यांना कर विवरणपत्रे जाहीर करण्यास सांगितले आहे. त्यावर ट्रम्प यांनी सांगितले की, असल्या गोष्टी मला सांगण्याचे तुमचे काम नाही. १९५२ पासून उमेदवारांनी करविवरणपत्रे जाहीर करण्याचे धोरण पाळले असून ट्रम्प यांनी मात्र त्याला नकार दिला आहे.