‘फॉक्स न्यूज’ वृत्तवाहिनीवर आयोजित केलेल्या चर्चेकडे पाठ फिरविल्यामुळे आयोवातील प्राथमिक फेरीत (कॉकस) आपली पीछेहाट झाल्याची कबुली रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. या फेरीत त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांनी बाजी मारत ट्रम्प यांना कडवे आव्हान दिले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्पच असतील, याचे स्पष्ट संकेत अमेरिकेच्या अनेक राज्यांतील प्राथमिक फेरीपूर्वीचे कौल देत होते. परंतु, क्रूझ यांनी त्यांना आयोवा ‘कॉकस’मध्ये अनपेक्षितरीत्या मागे टाकले. तसेच, याच पक्षाचे फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबिओ या स्पर्धेत तिसरे आले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी कुणाला मिळणार, या संदर्भात तिघांमध्ये सध्या चुरस निर्माण झाली आहे. ‘फॉक्स न्यूज’च्या वृत्तनिवेदिकेशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी या वाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला होता. या चर्चेत रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदासाठी उभे राहण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचा समावेश होता.