07 July 2020

News Flash

Coronavirus : अमेरिकेपेक्षाही चीनमध्ये अधिक बळी?

जाणीवपूर्वक आकडा लपविल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

फिलाडेल्फियातील रस्त्यावर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उतरलेला नागरिक.

जाणीवपूर्वक आकडा लपविल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

वॉशिंग्टन : चीनने करोना साथीत बळी पडलेल्यांचा सांगितलेला आकडा चुकीचा असून त्या देशातच जगातील सर्वाधिक बळी गेले आहेत. चीन हेतुपुरस्सर मृतांचा आकडा लपवत आहे,  असा संशय अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीनने जर हेतुपुरस्सर हा विषाणू पसरवल्याचे सिद्ध झाले तर त्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत झोपाळू जो बायडेन निवडून यावेत यासाठी चीन प्रयत्न करीत आहे, आमच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचा हा प्रकार आहे.

चीनमधील मृतांची संख्या अमेरिकेपेक्षाही जास्तच आहे. कोविड १९ साथीत त्यांच्याकडे खूप बळी गेले आहेत पण ते खरा आकडा सांगत नाहीत, असा आरोप करून ट्रम्प म्हणाले की, कोविड १९ म्हणजे करोना मृतांच्या संख्येत अमेरिका नव्हे तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. जर ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, स्पेन, इटली  या प्रगत देशात मृतांचा दर जास्त असेल तर तो चीनमध्ये कमी असणे शक्यच नाही. चीनने मृतांचा जो आकडा सांगितला तो खरा नाही त्यापेक्षा जास्त बळी तेथे गेले आहेत त्यांची संख्या अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. चीनलाही हे माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे पण कुणीही ते जाहीरपणे सांगायला तयार नाही.

आतापर्यंतच्या माहितीनुसार अमेरिकेत ३५,००० बळी गेले असून सात लाख लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. चीनमधील बळींची सुधारित संख्या ४६३२ असून खरा आकडा चाळीस हजारांच्या पुढे असण्याची शक्यता आहे असे आतापर्यंत सांगितले जात आहे.

दक्षिण कोरियात पुन्हा रुग्ण, पण एकूण वाढ कमी

बँकॉक : दक्षिण कोरियात काही जणांना पुन्हा संसर्ग होण्याच्या घटना सामोऱ्या आल्या असल्या, तरी रुग्णसंख्येतील वाढ कमी आहे रविवारी तेथे आठ नवीन रुग्ण सापडले असून जपानमध्ये दोन महिन्यात प्रथमच रोजची रुग्णसंख्या वाढ एक अंकी झाली आहे. कोरिया सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने म्हटले आहे की, दक्षिण कोरियात आतापर्यंत २३४ बळी गेले असून एकूण १०,६६१ जणांना संसर्ग झाला आहे. एकूण ८०४२ जण बरे झाले असून त्यांना विलगीकरणातून सोडून देण्यात आले आहे. १२,२४३ जणांवर चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचे निकाल बाकी आहेत.

अध्यक्ष मून जे इन यांनी सांगितले की, शेवटचा निश्चित रुग्ण बरा होईपर्यंत निर्बंध कमी करता येणार नाहीत. फेब्रुवारीचा उत्तरार्ध ते मार्चची सुरुवात या काळात दक्षिण कोरियात जास्त रुग्ण सापडले होते. त्यात दाएगू हे करोनाचे मुख्य केंद्र ठरले होते. दक्षिण कोरियात त्यानंतर काही काळ संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते नंतर सामाजिक अंतराचा निकष न पाळल्याने रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली होती. अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन व लोकांच्या नोक ऱ्या  वाचवणे याला आमचे प्राधान्य असल्याचे मून यांनी म्हटले आहे. दरम्यान, जपानमध्ये काही जणांना पुन्हा संसर्ग झाल्याची माहिती हाती येत असून तेथे बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल करून मर्यादित प्रमाणात व्यवहार सुरू करण्यात आले आहेत.

चीनने करोनाच्या मृतांचा जो आकडा सांगितला तो खरा नाही. त्यापेक्षा जास्त बळी तेथे गेले आहेत. त्यांची संख्या अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. चीनलाही हे माहिती आहे. सगळ्यांनाच माहिती आहे पण कुणीही ते जाहीरपणे सांगायला तयार नाही.

-डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

जगभरात १ लाख ६१ हजार २५१ जणांचा मृत्यू

पॅरिस : करोनामुळे जगभरात रविवापर्यंत १ लाख ६१ हजार २५१ जणांचा मृत्यू झाला असून १९३ देशांमध्ये २३ लाख ४९ हजार ५३१ हून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे, त्यापैकी पाच लाख १८ हजार ९०० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील मृतांची संख्या ३९ हजार ९० वर पोहोचली आहे, तर सात लाख ३५ हजार २८७ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर किमान ६६ हजार ८१९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत २३ हजार २२७ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ७५ हजार ९२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. स्पेनमध्ये २० हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ९५ हजार ९४४ जणांना लागण झाली आहे. फ्रान्समध्ये १९ हजार ३२३ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ५१ हजार ७९३ जणांना लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये १५ हजार ४६४ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख १४ हजार २१७ जणांना लागण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2020 2:41 am

Web Title: donald trump allegations on china for deliberately hiding death cases zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : अहमदाबादमध्ये रक्तद्रव उपचार चाचण्या सुरू
2 रेल्वे, विमानसेवेबाबत अद्याप निर्णय नाही
3 Coronavirus : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हायड्रॉक्सी क्लोरोक्विन घ्या!
Just Now!
X