महाभियोगाच्या आरोपपत्रात ठपका

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे डेमोक्रॅटसनी त्यांच्या विरोधातील महाभियोगाच्या आरोपपत्रात म्हटले आहे. ट्रम्प यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे.

ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार जो बिदेन व त्यांच्या मुलाविरोधात चौकशी सुरू करण्याची अट युक्रे नला लष्करी मदत देण्यासाठी घातली होती, त्या दोघांविरोधात चौकशी सुरू करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना दूरध्वनी केला होता. या सगळ्या प्रकाराच्या अनुषंगाने एका जागल्याने केलेल्या तक्रोरीच्या आधारे ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर यात दोन टप्प्यात साक्षीपुरावे नोंदवण्यात आले. ट्रम्प यांनी युक्रेनवर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी दडपण आणले, असे सांगून डेमोक्रॅ ट्सनी म्हटले आहे,की ट्रम्प यांनी लाचखोरी केली, त्यांनी सत्तेचा दुरुपयोग तर केलाच, शिवाय चौकशीत अडथळे आणले याचे सज्जड पुरावे आहेत.

निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार जो बिदेन यांना नामोहरम करण्यासाठी  ट्रम्प यांनी युक्रेनची मदत घेण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्या देशाच्या अध्यक्षांवर दबाव आणला. देशातील खुल्या व सौहार्दपूर्ण वातावरणात होणाऱ्या निवडणुकीत त्यांनी बाधा आणली. त्याच बरोबर देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण केला. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची अंतिम कारवाई सुरू करण्यासाठी येत्या काही दिवसात मतदान होणार असून ते महाभियोग सुनावणीला सामोरे जाणारे तिसरे अमेरिकी अध्यक्ष ठरणार आहेत.

रिपब्लिकन नेते डग कॉलिन्स यांनी महाभियोगाची कारवाई म्हणजे डेमोक्रॅट पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांवर डोळा ठेवून केलेला प्रसिद्धीचा खटाटोप असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्याविरोधात होणारी कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला. यात महाभियोग चालवण्याइतपत कु ठलाच गुन्हा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ही चौकशी म्हणजे थोतांड असल्याचे ट्रम्प यांनी आधीच म्हटले आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे.