अमेरिकेतील अध्यक्षीय उमेदवारांच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पाच राज्यांत झालेल्या प्राथमिक फेरीत प्रत्येकी तीन राज्यांत मुसंडी मारून आघाडी कायम ठेवली आहे. आता त्यांच्याबरोबरचे प्रतिस्पर्धी जवळपास नामोहरम झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी फ्लोरिडात विजय मिळवला. त्यांना तेथे ४६ टक्के मते पडली असून, प्रतिस्पर्धी सिनेटर मार्को रुबियो यांना केवळ २७ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. रुबियो यांनी शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी पराभव मान्य केला, आता ते पुढची राजकीय चाल काय खेळतात याकडे सगळय़ांचे लक्ष आहे.
ट्रम्प यांनी इलिनॉइस व नॉर्थ कॉरोलिनात त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांच्यावर विजय संपादन केला. पण ओहिओ या महत्त्वाच्या राज्यात गव्हर्नर जॉन कॉसिच यांनी ट्रम्प यांना धूळ चारली. त्यांनी या विजयाने आशेचा किरण निर्माण केला आहे. अब्जाधीश असलेल्या ट्रम्प यांना रोखण्याची आता थोडी आशा शिल्लक राहिली आहे. आताच्या स्थितीनुसार ट्रम्प यांच्याकडे ६२१ प्रतिनिधी मते आहेत. त्यांना रिपब्लिकनच्या उमेदवारीसाठी १२३७ मतांची गरज आहे. क्रूझ दुसऱ्या तर रुबियो तिसऱ्या क्रमांकावर आहेत. डेमोक्रॅटिक पक्षात हिलरी िक्लटन यांनी गेल्या आठवडय़ात बर्नी सँडर्स यांनी मिशिगनमध्ये केलेल्या पराभवाचा वचपा काढताना ओहिओत विजय मिळवून आघाडी कायम ठेवली आहे. फ्लोरिडा व नॉर्थ कॅरोलिनात त्यांनी सहज विजय मिळवले आहेत. बर्नी सँडर्स यांचा त्यांनी इलिनॉइसमध्येही पराभव केला आहे. क्लिंटन यांना आता १५६१ प्रतिनिधी मते मिळाली असून, सँडर्स यांना ८०० प्रतिनिधी मते आहेत. क्लिंटन यांना एकूण २३८२ मते आवश्यक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाची एकूण ४७६३ प्रतिनिधी मते आहेत.
ट्रम्प यांनी मियामी येथील भाषणात सांगितले, की आम्ही पक्षाला एकसंध ठेवले पाहिजे. लाखो लोक पक्षात सामील होत आहेत. डेमोक्रॅट व अपक्ष आमच्या पक्षात येत आहेत. भारत, जर्मनी, जपान, चीन, व्हिएतनाम यांच्यावर व्यापारासाठी आम्ही आता अवलंबून राहणार नाही, अ‍ॅपलचे आयफोन आता अमेरिकेत बनतील, चीनमध्ये नाही. देशातील उद्योगांना संरक्षण दिले जाईल. फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथे क्लिंटन यांनी सांगितले, की आम्हाला अडथळे दूर करायचे आहेत, भिंती बांधायच्या नाहीत, अमेरिकेला ज्या गोष्टींमुळे महानता मिळाली त्या आम्हाला गमवायच्या नाहीत. त्यांचा रोख ट्रम्प यांच्यावर होता. सँडर्स यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी सांगितले, की मी माघार घेणार नाही. मिसुरी येथे ट्रम्प व क्रूझ यांच्यात अटीतटीची लढत चालू आहे.

ट्रम्प यांची वक्तव्ये अमेरिकेच्या प्रतिमेस हानिकारक- ओबामा
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्ये विभाजनवादी राजकारणाची साक्ष देणारी असून, त्यामुळे अमेरिकेची प्रतिमा खराब होते आहे, असे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. ट्रम्प यांनी महिला व अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे. ट्रम्प प्रचाराच्या वेळी जी वक्तव्ये करीत आहेत त्यावर मीच नव्हेतर अनेकांनी टीका केली आहे. त्यांचे बोलणे अशिष्ट व विभाजनवादाला खतपाणी घालणारे आहे, लोकांना गप्प करणे, त्यांच्यात भीती पसरवणे आपल्याला पटलेले नाही, असे ओबामा यांनी म्हटले आहे.