अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यामध्ये सध्या टि्वटरवर शाब्दीक लढाई रंगली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानची कानउघडणी केली. पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला दडवून ठेवले तसेच पाकिस्तानने अमेरिकेसाठी काही केले नाही असा आरोप ट्रम्प यांनी केला.

त्यावर इम्रान खान यांनी लागोपाठ टि्वट करुन ट्रम्प यांना उत्तर दिले. अमेरिकेने आपल्या अपयशासाठी पाकिस्तानला बळीचा बकरा बनवू नये. त्याऐवजी अफगाणिस्तानात आज नाटोचे १ लाख ४० हजार सैन्य आहे, अफगाणिस्तानचे स्वत:चे २.५० लाख सैन्य तिथे असतानाही तालिबान आधीपेक्षा आता जास्त मजबूत का आहे ? याचे विश्लेषण करावे असे इम्रान यांनी सुनावले आहे.

९/११ च्या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सहभागी नव्हता. तरीही पाकिस्तानने अमेरिकेच्या दहशतवादाविरुद्धच्या युद्धात साथ देण्याचा निर्णय घेतला. या लढाईत पाकिस्तानची जिवीतहानी झाली. त्याशिवाय पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. आमचे आदिवासी भाग उद्धवस्त झाले. लाखो लोक बेघर झाले. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांवर या युद्धाचा परिणाम झाला. इतके बलिदान दुसऱ्या कुठल्या सहकारी देशाने दिले त्याचे नाव ट्रम्प सांगू शकतात ? असा सवाल इम्रान खान यांनी त्यांच्या टि्वटसमधून विचारला आहे.

इम्रान यांच्या या टि्वटसना ट्रम्प यांनी काही तासांच्या आत उत्तर दिले. ओसामा बिन लादेनला आम्ही खूप आधीच पकडू शकलो असतो. आम्ही पाकिस्तानला अब्जावधी डॉलर मोजले पण लादेन तिथे आहे हे त्यांनी सांगितले नाही.

आता आम्ही पाकिस्तानला अब्जावधी डॉलर देत नाही. कारण ते आमचा पैसा घेणार पण आमच्यासाठी काही करणार नाहीत. बिन लादेन, अफगाणिस्तान ही त्याची उदहारणे आहेत. ते सुद्धा दुसऱ्या देशांसारखेच आहेत जे अमेरिकेकडून फक्त घेतात पण त्याबदल्यात काही देत नाहीत. हे सर्व आता संपले आहे असे टि्वट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.