अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडिअमवर केलेल्या भाषणात भारताबरोबरचे संरक्षण संबंध अधिक बळकट करणार असल्याची घोषणा केली. मंगळवारी भारताबरोबर ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार होऊ शकतो असे ट्रम्प म्हणाले.

“भारतीय संरक्षण दलांना हेलिकॉप्टर आणि अन्य लष्करी साहित्य पुरवण्यासाठी उद्या आमचे प्रतिनिधी ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी करतील, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे” असे ट्रम्प म्हणाले.

शत्रूच्या मनात धडकी भरवणारी पृथ्वीवरील उत्तम शस्त्रास्त्रे आम्ही भारताला देऊ. आम्ही उत्तम शस्त्रांची निर्मिती करतोय आणि भारताबरोबर आमचा व्यापार सुरु आहे असे ट्रम्प म्हणाले.

आणखी वाचा – सीमेवरील दहशतवाद थांबवण्यासाठी पाकसोबत चर्चा सुरु – डोनाल्ड ट्रम्प

एमएच ६० रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टरचा करार
भारतीय नौदलासाठी २४ बहुपयोगी ‘एमएच ६० रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा करार होऊ शकतो. भारताला मागील एक दशकाहून अधिक काळापासून इन हंटर हेलिकॉप्टरची गरज होती. लॉकहिड मार्टिनद्वारे निर्मित हेलिकॉप्टर पाणबुडी आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वांत अत्याधुनिक समुद्री हेलिकॉप्टर मानले जातात. यामुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते हिंद महासागरात चीनचे आक्रमक धोरण पाहता भारतासाठी ‘एमएच ६० रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टर आवश्यक होते.