अमेरिकेत ‘यूएस कॅपिटॉल’वर समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला असून यापुढील काळात नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे सत्तेचे हस्तांतरण सहजपणे केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाल्यानंतर ट्रम्प यांना उपरती झाली असून त्यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले आहे, की कॅपिटॉल येथे काही लोक बळाच्या जोरावर आत घुसले. अमेरिका हा कायदा व सुव्यवस्था पाळणारा देश आहे. इतर सर्व अमेरिकी लोकांप्रमाणेच आपणही संसदेवरील हल्ल्याने संतप्त झालो असून त्या वेळी जो गोंधळ झाला तो रोखण्यासाठी आपण तातडीने राष्ट्रीय सुरक्षारक्षक तैनात केले होते. त्याशिवाय संघराज्य दलेही तैनात केली व त्यांच्या मदतीने घुसखोरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

ट्रम्प यांनी यू टय़ूबच्या माध्यमातून तयार केलेली चित्रफीत व्हाइट हाऊसने प्रसारित केली आहे. निदर्शकांनी संसदेत घुसून अमेरिकी लोकशाहीच्या सिंहासनाची अवमानना केली, असेही त्यांनी म्हटले आहे. ज्यांनी हिंसाचार व विध्वंस केला ते आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. नुकतीच निवडणूक झाली असून त्याचा भावनिक ज्वर अजून थांबलेला नाही हे खरे असले तरी आता लोकांनी शांत होणे अपेक्षित होते, असे त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांचा स्वमाफीचा विचार

ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी पदभार सोडण्यापूर्वी स्वमाफी देण्याच्या शक्यतेबाबत निकटच्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत केल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांनी दिले आहे. स्वमाफी दिल्यास त्याचे कायदेशीर आणि राजकीय परिणाम काय होतील, अशी विचारणाही ट्रम्प यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

‘कॅपिटॉल’वरील हल्ल्याच्या निषेधार्थ तेथील शिक्षणमंत्री बेटसी डीव्हॉस आणि परिवहनमंत्री इलन चाओ यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हिंसाचाराचा उद्रेक झाल्याने व्यथित झाल्याचे या दोघींनी म्हटले आहे.

पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

कॅपिटॉल इमारतीमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाल्यानंतर निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने या दंगलीतील मृतांची संख्या आता पाच झाली आहे. निदर्शकांशी झालेल्या चकमकीत कॅपिटॉल पोलीस अधिकारी ब्रायन सिकनिक बुधवारी जखमी झाले, त्यानंतर आपल्या कार्यालयात परतल्यानंतर ते कोसळले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.