वॉशिंग्टन : इराणवर मारा करण्यासाठी आमचे सैन्य पूर्ण सज्ज होते, मात्र युद्ध झाल्यास १५० लोक मृत्युमुखी पडतील, असे सेनाप्रमुखांनी सांगितल्याने ही जीवितहानी टाळण्यासाठी दहा मिनिटांतच युद्धाचा निर्णय मी मागे घेतला, असे ट्वीट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

इराणने आपले ड्रोन विमान पाडल्याने त्या देशातील तीन ठिकाणी मारा करण्याची अमेरिकेची योजना होती. मात्र मनुष्यरहित ड्रोनच्या बदल्यात १५० इराणी नागरिकांचा बळी घेणे योग्य नसल्याचे वाटल्याने हा निर्णय स्थगित केला आहे. आम्हाला प्रत्युत्तराची घाई नाही, असे ट्रम्प यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले.

दरम्यान, अमेरिकेच्या विमानाने आमच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याने आम्ही त्यांचे ड्रोन पाडले, असा दावा इराणने केला. मात्र ड्रोनने इराणच्या हवाई हद्दीचा भंग केला का, याबाबत अमेरिकन प्रशासनातच संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे असा हल्ला हा आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग ठरेल, या निष्कर्षांमुळेच ट्रम्प यांनी घोषणेनंतर दहाच मिनिटांत हल्ल्याची योजना स्थगित केल्याची चर्चा आहे