अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. बराक ओबामा अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली होती. ओबामांनी माझे फोन टॅप केले होते असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या आधी बराक ओबामा यांनी माझ्यावर पाळत ठेवली होती. बराक ओबामांनी ट्रम्प टॉवरचे फोन टॅप केले होते असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ओबामा यांच्याविरोधात न्यायालयात एक निष्णात वकील सशक्त खटला सादर करू शकेल इतकी तथ्ये आपल्याकडे आहेत असे त्यांनी म्हटले. निवडणुकीसारख्या पवित्र काळात माझे फोन टॅप करण्याइतकी ओबामांची पातळी घसरली असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या काळात झालेल्या वॉटरगेट स्कॅंडलचा दाखला देत ट्रम्प म्हणाले की हे वॉटरगेटपेक्षाही भयावह आहे. ओबामा हे वाइट प्रवृत्तीचे आहेत की रुग्ण आहेत असे ट्विट त्यांनी केले आहे. बराक ओबामांची ही वागणूक बेकायदा असून त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
१९७२ मध्ये वाटरगेट ऑफिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यालयात चोरी झाली होती.

ही चोरी रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष असलेल्या रिचर्ड निक्सन यांच्या प्रशासनाने ही बाब उघड होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. कालांतराने ही बाब उघड झाली. आपल्यावर महाभियोग चालवला जाईल हे ओळखल्यानंतर निक्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांना अद्याप बराक ओबामा यांनी काहीही उत्तर दिलेले नाही. ट्रम्प यांनी आपण हा आरोप कशाचा आधारावर केला आहे हे सांगितले नाही. तसेच याबाबत आपण काही कायदेशीर कारवाई करणार आहोत की नाही याबाबतही त्यांनी खुलासा केला नाही. ओबामा यांनी आपल्यावर पाळत ठेवली होती इतका पुरावा आहे असे त्यांनी म्हटले आहे परंतु कारवाई करणार की नाही याचा खुलासा त्यांनी केला नाही. हे करणे बेकायदा नाही का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.