इंडियानात दणदणीत विजय, आता केवळ कसिच यांचे आव्हान
इंडियानातील लढतीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे कडवे प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांना पराभूत केले आहे. त्यांच्या या विजयानंतर टेड क्रूझ यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ट्रम्प यांना आता ओहिओचे गव्हर्नर जॉन कसिच यांचेच आव्हान उरले असले तरी ते पेलणे त्यांना कठीण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे इंडियानातील विजयाने ट्रम्प यांना ८ नोव्हेंबरला होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्याशी त्यांची निर्णायक झुंज अपेक्षित आहे.
इंडियानात ट्रम्प विजयी झाले असले तरी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन मात्र पराभूत झाल्या आहेत. त्यांना त्यांचे प्रतिस्पर्धी बेर्नी सँडर्स यांनी पराभूत केले. या पराभवामुळे ६८ वर्षीय हिलरी क्लिंटन यांच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठीच्या वाटचालीवर मात्र काहीही परिणाम होणार नाही.
राजकारणाची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या आणि अवघ्या वर्षभरापूर्वी राजकारणात आलेल्या ६९ वर्षीय ट्रम्प यांनी मात्र रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीत मोठी आघाडी घेताना इतिहास घडवला आहे. यापूर्वी अशी कामगिरी फक्त ड्वाइट आयसेनहॉवर यांना करता आली होती. ‘‘मला उमेदवारी मिळाल्यात जमा आहे. त्यामुळे आता हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणे गरजेचे आहे,’’ असे ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकेला तिची सर्वोच्च महानता पुन्हा मिळवून देऊ, असा दावा ट्रम्प यांनी न्यूयॉर्क येथे प्रचार कार्यालयात पत्रकारांसमोर केला. क्रूझ हे कठीण प्रतिस्पर्धी होते पण त्यांनी माघार घेतली हे चांगले झाले, असे ट्रम्प यांनी सांगितले.
हिलरी क्लिंटन या देशाच्या अध्यक्ष म्हणून चांगले काम करू शकणार नाहीत. त्यांना अर्थकारण तसेच व्यापार व्यवसाय काही समजत नाही, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.
ट्रम्प यांना इंडियानात ५७ पैकी ५१ मते मिळाली असून आता त्यांच्याकडे एकूण १०४७ प्रतिनिधी मते आहेत. त्यांना उमेदवारीसाठी १४० मते कमी आहेत. शेवटच्या टप्प्यात ते ही मते मिळवतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

इंडियानातील बलाबल..
* रिपब्लिकन पक्षाच्या ९८ टक्के मतांपैकी ५३.३ टक्के मते ट्रम्पना. क्रूझ यांना ३६.६ टक्के. कसिच यांना केवळ ७.६ टक्के मते.
* डेमोक्रेटिक पक्षाच्या ९८ टक्के मतांपैकी सँडर्स यांना ५२.५ टक्के मते. क्लिंटन यांना ४७.५ टक्के मते.