अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी ट्रम्प यांचा पाहुणचार करणार आहेत. या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाला लाखो लोक हजेरी लावणार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांचे सकाळी ११.४० वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन होणार आहे. तत्पूर्वीच हा देशातील एक भव्य-दिव्य सोहळा असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद येथे आगमन झाल्यानंतर ट्रम्प यांचा २२ किमीचा रोडशो असणार आहे. दरम्यान, ते साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. त्यानंतर खचाखच भरलेल्या मोटेरा स्टेडियममधील लोक ट्रम्प आणि मोदी यांचे भव्य स्वागत करतील. ट्रम्प यांनी मोदींचे ट्विट रिट्वीट केले आहे. पत्रकारांशी संवाद साधतानाही ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांची मैत्री आणि भव्य स्वागत सोहळा याचा उल्लेख केला.

दरम्यान, मोटेरा स्टेडियममधील मुख्य व्यासपीठावर केवळ अमरेकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या तीनच व्यक्ती उपस्थित असतील. यावेळी ट्रम्प आणि मोदी लोकांशी संवाद साधतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आपण उत्सुक असल्याचे ट्विटद्वारे म्हटले आहे. ट्रम्प यांच्यासोबतची भेट द्वीपक्षीय संबंध अधिक मजबूत करतील असेही त्यांनी म्हटले आहे. या ऐतिहासिक दौऱ्याची सुरुवात अहमदाबाद येथून होईल असे काल एका ट्विटद्वारे मोदींनी म्हटले होते.

आणखी वाचा – असा असेल ट्रम्प यांचा 36 तासांचा भारत दौरा

व्हीव्हीआयपी घोडदळाच्या साथीने होणार रोड शो
ट्रम्प यांचा रोड शो हा उघड्या वाहनातून होणार नसून व्हीव्हीआयपी घोडदळाच्या साथीने होणार आहे. यावेळी ठराविक वेगाने त्यांचा ताफा पुढे जात राहील. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा ठराविक अंतरावर लोकांची गर्दी असेल. यावेळी अधूनमधून सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहेत. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील ह्युस्टन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्याचधर्तीवर अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम होणार आहे.