अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत २०२० मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी प्रचारालाही त्यांनी मंगळवारपासून औपचारिकरित्या सुरुवात केली. एकीकडे ट्रम्प यांची प्रचाराला सुरुवात केली असतानाच इकडे भारतामध्ये ट्रम्प यांच्या एका चाहत्याने त्यांचा पुतळाच उभा केला आहे. ट्रम्प यांच्या या चाहत्याचे नाव आहे बुसा कृष्णा.

तेलंगणमधील शेतकरी असणारा कृष्णा हा पहिल्यांदा काही वर्षांपूर्वी प्रकाश झोतात आला जेव्हा ट्रम्प यांच्या फोटोची पुजा करतानाचा त्याचा फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासून तो ‘ट्रम्प यांचा भक्त’ म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहे. नुकताच १४ जून रोजी ट्रम्प यांचा वाढदिवस झाला. हा वाढदिवस कृष्णाने अगदी हौसेने साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशीच त्याचे ट्रम्प यांचा सहा फुटांचा पुतळा उभारला आहे. त्याने या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून त्याची पुजाही केली.

जनगाव तालुक्यातील कोने गावाचा रहिवाशी असलेला कृष्णाने ट्रम्प यांचा फोटो घरातील देव्हाऱ्यात ठेवला आहे. रोज मी देवघरातील देवांबरोबरच ट्रम्प यांच्या फोटोचीही पुजा करतो असं कृष्णा मोठ्या अभिमानाने सांगतो. रोज सकाळी कृष्णा ट्रम्प यांच्या फोटोला टिळा लावून, हळद-कुंकू आणि फुले वाहून त्याची पुजा करतो असं ‘हिंदुस्तान टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेमध्ये तेलंगणमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या श्रीनिवास कोचीभोतला याची २०१७ साली फेब्रुवारी महिन्यात वर्णद्वेषातून एका माजी अमेरिकन नौदल अधिकाऱ्याने हत्या केली. या घटनेनंतर कृष्णाने ट्रम्प यांची पुजा करण्यास सुरुवात केल्याचे त्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना सांगितले. ‘श्रीनिवासच्या हत्येसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर मला खूप दु:ख झाले. त्यावेळी भारताचे आणि भारतीयांचे महत्व ट्रम्प तसेच अमेरिकन लोकांना समजण्यासाठी त्यांना प्रेम आणि आपुलकी दाखवणे गरजेचे असल्याचे मला वाटले. तेव्हापासून मी ट्रम्प यांची पुजा करु लागलो. एक दिवस या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहचतील अशी मला अपेक्षा आहे’, असं कृष्णा म्हणाला.

ट्रम्प यांची पुजा करण्याची ही स्टंटबाजी असल्याचे आरोप कृष्णाने फेटाळून लावले आहेत. भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारावेत म्हणून मी ट्रम्प यांची पुजा करत असल्याचे कृष्णा सांगतो. ‘मी आजपासून रोज या पुतळ्याची पुजा करणरा आहे’ असं ट्रम्प यांच्या नवीन पुतळ्याबद्दल बोलताना कृष्णाने ‘एएनआय’ला सांगितले.