अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विरोधकांनी केलेल्या टीकेनंतरही आपल्या मुस्लिमांविषयीच्या वक्तव्यावर ठाम आहेत.

मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. कॅलिफोर्नियातील हत्याकांडानंतर त्यांनी हे वक्तव्य केले असून त्यांच्या अध्यक्षीय प्रचारातील हे सर्वात प्रक्षोभक विधान मानले जात आहे. त्यांच्या प्रतिस्पध्र्यानी या विधानाचा निषेध केला आहे. मात्र सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने ही बंदी घालावी अशी आपण मागणी करत आहोत. ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलीन डिलेनो रूझवेल्ट यांनीही जपान, जर्मनी आणि इटलीच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी लागू केली होती याचा त्यांनी दाखला दिला. त्याच प्रकारे आपणही सध्याच्या काळापुरती ही बंदी लागू करावी असे म्हणत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या प्रचार कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देशात नेमके काय चालले आहे हे कळत नाही, तोपर्यंत परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या मुस्लिमांना बंदी घातली पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेत प्रवेशासाठी धर्माचा मुद्दा आड आणला जाणार नाही असे स्पष्ट केले असताना ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. ओबामा यांना मूलतत्त्ववादी इस्लाम हा मुख्य धोका आहे हे समजलेलेच नाही, अशी टीका ट्रम्प यांनी केली. व्हाइट हाउसच्या शर्यतीत असलेले ट्रम्प हे बडे उद्योगपती असून कॅलिफोर्नियात पाकिस्तानी जोडप्याने केलेल्या हिंसाचारानंतर त्यांनी प्रक्षोभक विधान केले.

दक्षिण कॅरोलिना येथे त्यांनी सांगितले, की कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर ९/११ सारखे हल्ले होतील. त्यामुळे मुस्लिमांना देशात प्रवेश करण्यावर बंदी घातली पाहिजे. मुस्लिमांच्या मनात अमेरिकी लोकांच्या संदर्भात द्वेषाची भावना आहे, असे ‘प्यू रीसर्च सेंटर’चे संशोधन असल्याचे सांगण्यात आले. सेंटर फॉर सिक्युरिटी पॉलिसीच्या जनमत चाचणीनुसार २५ टक्के लोकांनी अमेरिकनांविरोधातील हिंसा हा जागतिक जिहादचा भाग असल्याचे समर्थन केले होते व ५१ टक्के लोकांनी अमेरिकेतील मुस्लिमांना शरियत कायद्याचा पर्याय दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. ट्रम्प यांनी असे म्हटले आहे, की जनमत चाचण्या काहीही असल्या तरी जेथे द्वेषाची भावना येते, तेथे आपणही त्यांच्याविरोधात निर्धार केला पाहिजे. अमेरिकेतील काही मशिदी बंद केल्या पाहिजेत तर काहींवर लक्ष ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली असून हे विधान फुटीरतावादी व निषेधार्ह असल्याचे सांगितले.

ट्रम्प हे एका देशाचे नव्हे तर बेछूट हिंसा करणाऱ्या टोळक्याचे नेते आहेत. अमेरिकेसारख्या महान देशाचे नेते नाहीत असेच यातून दिसत असल्याची प्रतिक्रिया कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्सचे कार्यकारी संचालक निहाद अवाद यांनी व्यक्त केली.