अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पत्रकारांवर टीका केली आहे. येथील पत्रकार हे देशद्रोही आहेत, ते त्यांच्या वृत्तांकनामुळे जनतेचा जीव धोक्यात घालत आहेत, त्यांना ट्रम्प यांच्यावर टीका करण्याच्या समस्येने ग्रासले आहे, असं ट्रम्प म्हणाले.

ट्विटरद्वारे माध्यमांना लक्ष्य करताना पत्रकार चुकीच्या बातम्यांच वार्तांकन करत आहेत, प्रसारमाध्यमे ट्रम्पविरोधी भूमिकेच्या अतिरेकामुळे आमच्या सरकारच्या कामकाजाची अंतर्गत माहिती उघड करत आहेत. अमेरिकेच्या मरणासन्न वृत्तपत्रांमधील माझा तिरस्कार करणारे पत्रकार अनेकांचा जीव धोक्यात घालत आहेत. माझं प्रशासन चांगलं काम करत असतानाही पत्रकारांचं ९० टक्के वार्तांकन हे नकारात्मक आहे, अशी टीका ट्रम्प यांनी केली.


पत्रकारांनी मुख्य मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी माझ्या नेतृत्वाखाली देश उत्तम प्रगती करत आहे. काहीही झालं तरी माध्यमांना हा देश विकता येणार नाही. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासोबत अचूक वार्तांकनाची जबाबदारी पाळणे बंधनकारक आहे. प्रशासनाने अनेक चांगली कामे करूनही प्रसारमाध्यमांनी त्याबाबत नकारात्मक वृत्ते छापली. मरणासन्न अवस्थेतील न्यूयॉर्क टाइम्स आणि अ‍ॅमेझॉन वॉशिंग्टन पोस्टसारखी माध्यमे केवळ नकारात्मक छापण्यावरच भर देतात. त्यांना ट्रम्प यांच्यावर टीका करण्याच्या समस्येने ग्रासले आहे. यातून खरोखरच हिंसाचार घडू शकतो. हे देशभक्तीचे काम नाही. असे ट्रम्प म्हणाले.