हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठयावरुन जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक बदल झाला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधासंबंधी नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तसेच करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“करोना व्हायरसवर उपचारासाठी मी लाखो डोस खरेदी केले आहेत. दोन कोटी ९० लाखापेक्षा जास्त डोस खरेदी केले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. भारतातून भरपूर औषधे येणार आहेत. तुम्ही निर्बंध हटवू शकता का? असे मी मोदींना विचारले. ते महान आहेत. ते खूपच चांगले आहेत. भारतासाठी औषधांची आवश्यकता असल्याने त्यांनी हे निर्बंध घातले होते” असे ट्रम्प म्हणाले.

हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती. पण भारत सरकारने त्याआधीच औषध विक्रीच्या धोरणामध्ये बदल झाल्याचे अमेरिकेला कळवले होते.

भारताने काय उत्तर दिलं होतं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधावरुन जशास तसे उत्तर देण्याची भाषा केल्यानंतर भारतानेही सुनावलं. “भारत आपल्या शेजारी देशांना व करोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल. त्यामुळे यावरुन कुठलेही अंदाज बाधू नका तसेच राजकारणही करु नका” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं होतं.

भारतात काय आहे करोनाची स्थिती

दरम्यान भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ७७३ नवे रुग्ण आढळले असून ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतातील करोनाबाधितांची संख्या ५१९४ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १४९ झाली आहे. ४०१ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump change stand supports indias position on hydroxychloroquine dmp
First published on: 08-04-2020 at 10:51 IST