पाकिस्तानला बिगर-नाटो मित्र देशातून वगळण्याची मागणी

पाकिस्तानला बिगर-नाटो मित्रदेशाचा देण्यात आलेला दर्जा रद्द करावा, अशी विनंती अमेरिकेतील दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रातील एका उच्चपदस्थ तज्ज्ञाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला केली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात-ऊद-दावचा म्होरक्या हाफीज सईद याची लाहोर न्यायालयाने नजरकैदेतून सुटका केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाला वरील विनंती करण्यात आली आहे.

दहशतवादी कृत्यांमधील सहभागाबाबत हाफीज सईदवर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केले होते, जानेवारी महिन्यापासून सईद नजरकैदेत होता. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेने सईदला दहशतवाद्यांचा म्होरक्या जाहीर केले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास नऊ वर्षे लोटली तरीही अद्याप सईदवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला देण्यात आलेला बिगर-नाटो  मित्रदेशाचा दर्जा रद्द करण्याची वेळ आली आहे, असे ब्रूस रिडेल या दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रातील उच्चपदस्थ तज्ज्ञाने केली आहे.

हाफीज मोकळा

लाहोर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात-ऊद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याला पाकिस्तान सरकारने अन्य कोणत्याही प्रकरणांत जखडून ठेवले नाही तर तो गुरुवारी मध्यरात्रीपासून मुक्तपणे संचार करू शकणार आहे, असे त्याच्या वकिलांनी सांगितले. लाहोर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा समावेश असलेल्या पंजाब प्रांताच्या न्यायिक आढावा मंडळाने बुधवारी ३० दिवसांच्या नजरकैदेची मुदत संपल्याने सईदच्या सुटकेचा एकमताने निर्णय दिला. पाकिस्तान सरकारने त्याला अन्य कोणत्याही खटल्यात जखडून ठेवले नाही तर सईद मुक्तपणे संचार करू शकणार आहे. त्यामुळे पंजाब सरकार त्याला अन्य खटल्यांत नजरकैदेत ठेवेल, अशी भीती आम्हाला वाटत असल्याचे सईदचे वकील ए. के. डोगर यांनी सांगितले.

सईदला मुख्य प्रवाहात आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

नवी दिल्ली : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची नजरकैदेतून सुटका करण्याच्या निर्णयावर भारताने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेल्या सईदला मुख्य प्रवाहात आणण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे भारताने म्हटले आहे. दहशतवाद्यांना कठोर शासन करण्याबाबत आणि सत्ताबाह्य़ शक्तींना पाठीशी घालण्याबाबत पाकिस्तान गंभीर नाही, हेच त्यांच्या कृतीवरून स्पष्ट होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेल्या सईदची मुक्तता करणे आणि त्याला दहशतवादी कृत्ये सुरू ठेवण्याची मुभा देणे या बाबत केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही संताप व्यक्त केला जात आहे, असे मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. केवळ मुंबईवरील दहशतवादी हल्लाच नव्हे तर बंदी घालण्यात आलेल्या जमात-ऊद-दावाचा म्होरक्या सईद हा शेजारी देशांतील अन्य दहशतवादी हल्ल्यांनाही जबाबदार आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले.