डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे खळबळजनक विधान
जगातील एकूण मुस्लिमांपैकी २७ टक्के मुस्लिम फारच दहशतवादी विचारांचे आहेत, असे म्हणून अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला रविवारी दिलेल्या मुलाखतीतत ट्रम्प यांनी हे विधान केले. मुलाखतीदरम्यान त्यांना सांगण्यात आले की जगातील १.६ अब्ज मुस्लिमांपैकी केवळ १ लाख मुस्लिम जिहादी कारवायांत सहभागी आहेत. त्याचा प्रतिवाद करताना ट्रम्प म्हणाले की, हा आकडा इतका कमी असूच शकत नाही. ज्यांनी कोणी हा अहवाल मांडला आहे त्यांचा अंदाज पूर्ण चुकला आहे. माझ्या मते २७ टक्के मुस्लिम अतिशय दहशतवादी विचारसरणीचे आहेत. हे प्रमाण ३५ टक्के इतकेही असू शकते. मुस्लिमांमध्ये अतिषय प्रखर अमेरिकाविरोधी भावना आहे. पॅरिस आणि कॅलिफोर्निया येथे झालेल्या हत्याकांडांवरून त्यांची मानसिकता दिसून येते. आयसिस ज्या प्रकारे निरपराध व्यक्तींचे शिरच्छेद करत आहे आणि लोकांना लोखंडी पजऱ्यात भरून पाण्यात बुडवून ठार मारत आहे, त्यावरून ते दिसून येते. आला या सगळयाचा बिमोड करण्याची वेळ आली आहे, असे ट्रम्प म्हणाले.