उत्तर कोरियाचा आरोप; चिथावणीखोर वक्तव्ये जबाबदार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात सयुक्त राष्ट्रांत केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांनी उत्तर कोरियाविरुद्ध युद्धाची ठिणगी पेटवली असल्याचे उत्तर कोरियाचे परराष्ट्रीय मंत्री यांनी रशियन ‘टीएएसएस’ वृत्तसंस्थेला सांगितले.

ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉन्ग उन यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी होत असून, या दोन्ही आण्विक राष्ट्रांचे प्रमुख एकमेकांचा अपमान करीत आहेत. ट्रम्प यांनी सयुक्त राष्ट्रांत केलेल्या चिथावणीखोर आणि अविवेकी वक्तव्यामुळे त्यांनी उत्तर कोरियाविरुद्ध युद्धाची ठिणगी पेटवली असल्याचे उत्तर कोरियाचे परराष्ट्रीय मंत्री री यॉन्ग-हो यांनी रशियाच्या वृत्तसंस्थेला प्योंगयांग येथे दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

किम जॉन्ग उन यांनी आधीच अमेरिकेला उभ्या जगासमोर अपमान करून घ्यायचा नसल्यास आपले वर्तन सुधारत आम्हाला लक्ष करू नये अशी कडक चेतावणी दिली होती, असे री यांनी सांगितले. री यांनी सयुक्त राष्ट्रांकडून लादण्यात आलेल्या कठोर र्निबधांचा यावेळी विरोध केला. अशाप्रकारे र्निबध लादून आमची गळचेपी करण्याचा प्रयत्न म्हणजे युद्ध पुकारण्यासारखेच असल्याचे आम्ही याआधीच बरेच वेळा स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांतील भाषणात किम जॉन्ग उन याला रॉकेट मॅन असे संबोधत उत्तर कोरियाने आपल्या कारवाया थांबविल्या नाही तर या देशाला नष्ट करण्यात येईल, असा सज्जड दम भरला होता. मागील काही महिन्यांत उत्तर कोरियांच्या अणुचाचण्यांमुळे या भागात तणाव वाढला आहे. प्योंगयांगकडून विविध क्षेपणास्त्रे आणि त्यांची सहावी व आतापर्यंतची सर्वाधिक शक्तिशाली अणुचाचणी मागील महिन्यात करण्यात आली होती.