अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय हिंसेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न बुधवारी (भारतीय वेळेनुसार) राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाला दिलेल्या शेवटच्या भाषणात केला. ट्रम्प यांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये चार वर्षांच्या कार्यकाळामध्ये काय काय केलं याचा पाढा वाचून दाखवला. त्याचबरोबर त्यांनी मी सुरु केलेल्या आंदोलनाची ही केवळ सुरुवात असल्याचा सूचक इशाराही दिला. एका फेअरवेल व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना शुभेच्छाही दिल्या. “या आठवड्यात आपल्याला नवीन सरकार मिळणार आहे. आम्ही सर्व प्रार्थना करतो की नवीन सरकारला अमेरिकेला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यात यश मिळो,” असंही ट्रम्प या व्हिडीओत म्हणाले. “आम्ही त्यांना शुभेच्छा देतच आहोत पण त्याच वेळी नशीबही त्यांना साथ देवो हीच प्रार्थना करतो,” असंही ट्रम्प या व्हिडीओत म्हणताना दिसतात.

नक्की वाचा >> चीनमध्ये उइगर मुस्लिमांचा अक्षरशः नरसंहार सुरुय; ट्रम्प प्रशासनाचा निरोपापूर्वी चीनला दणका

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानामध्ये आणि मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचे आरोप ट्रम्प यांनी केले होते. मात्र त्यांना यासंदर्भातील कोणतेही पुरावे सादर करता आले नाही. ट्रम्प यांनी आपल्या या शेवटच्या भाषणामध्ये बायडेन यांचा थेट उल्लेख एकदाही केला नाही. त्यांनी नवीन सरकारचा उल्लेख करताना, “पुढील सरकार” असं म्हटलं. ट्रम्प यांच्या अनेक समर्थकांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचं वाटतं.

आपल्या शेवटच्या भाषणामध्ये अमेरिकेच्या मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी मागील चार वर्षांचा ट्रम्प प्रशासनाचा कार्यकाळ म्हणजे अमेरिकेतील लोकांसाठी एखाद्या विजयासारखा असल्याचा दावा केला. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी आपल्या प्रमुख कामगिरीमध्ये मध्य-पूर्वेतील देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणे, करोना विषाणूसंदर्भातील लसीकरणाबरोबरच इतर काही गोष्टींचा उल्लेख केला. ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटी झालेल्या राजकीय हिंसेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना मागील चार वर्षांमध्ये घेतलेल्या चांगल्या निर्णयांची अमेरिकेला पुन्हा एकदा आठवण करुन दिली.

“राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी सर्वात पहिली प्राथमिकता ही अमेरिकेबद्दल सतत वाटणारी चिंता, येथील श्रमिक आणि अमेरिकन कुटुंबांचे सर्वोत्तम हित हीच होती. कमीत कमी टीका होईल असा मार्ग निवडावा असा प्रयत्न मी कधीही केला नाही. मी अनेक कठीण विषयांवर कठोर निर्णय घेतले कारण तुम्ही असे निर्णय घेण्यासाठीच माझी निवड केली होती,” असंही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना, बुधवारी दुपारी मी नवीन प्रशासनाकडे सत्ता सोपवणार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडून सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाची ही केवळ सुरुवात आहे. असं या पूर्वी कधीही काही घडलेलंं नव्हतं, असंही ट्रम्प म्हणाले. हा आगामी सरकारसाठी सूचक इशारा असल्याचे सांगितले जात आहे.