अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या विशेष मेजवानीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे नेते हजर राहणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

डॉ. मनमोहन सिंग यांनी यापूर्वी या मेजवानीचे निमंत्रण स्वीकारले होते, मात्र आपण मेजवानीला हजर राहू शकणार नसल्याचे त्यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयास कळविले आणि त्याबद्दल खंत व्यक्त केली.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना मेजवानीसाठी निमंत्रित करण्यात आले नाही त्यामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हेही या मेजवानीला हजर राहणार नाहीत. प्रथेनुसार काँग्रेस पक्षाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ट्रम्प यांची भेट घेण्याची परवानगी देणे आवश्यक होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने परवानगी न दिल्याबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले नाही त्याच्या निषेधार्थ आपण या मेजवानीला हजर राहणार नसल्याचे लोकसभेतील काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

एखाद्या देशाचे प्रमुख आले असताना प्रमुख विरोधी पक्षाच्या सदस्यांना त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची परवानगी न देणे, हा प्रकार बहुधा प्रथमच घडला असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे.