वैद्यकीय चाचण्यात निर्वाळा; पुस्तकातील आरोप फोल

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना बोधन किंवा आकलनात्मक पातळीवर कुठल्याही समस्या नाहीत, असे वैद्यकीय चाचण्यात दिसून आले आहे, अशी माहिती व्हाइट हाउसच्या डॉक्टरांनी दिली आहे. अमेरिकी अध्यक्षांनी वार्षिक वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या असून त्यांच्या मानसिक व बौद्धिक तसेच आकलनात्मक क्षमतांबाबत अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. मायकेल वुल्फ यांच्या ‘फायर अँड फ्युरी’ या पुस्तकात ट्रम्प यांच्या आकलन क्षमतेपासून अनेक आरोप करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांनी वैद्यकीय चाचणी करून घेण्याचे ठरवले होते. ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनाच त्यांच्या मानसिक स्थिरतेची चिंता वाटते असे पुस्तकात म्हटले होते.

ट्रम्प यांनी ट्विटरवर आपण बुद्धिमानच नव्हे तर प्रतिभावान आहोत, असा दावा केला होता. वैद्यकीय चाचण्यानंतर व्हाइट हाउसच्या डॉक्टरांनी सांगितले, की अध्यक्ष ट्रम्प यांची प्रकृती तूर्त तरी ठणठणीत आहे. नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल डॉ. रॉनी जॅकसन यांनी ट्रम्प यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर केला आहे. जॅकसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की ट्रम्प यांनी आकलनात्मक चाचण्या करण्याचा आग्रह धरला होता खरेतर कायद्यानुसार या चाचण्यांची आवश्यकता नाही. माँट्रियल कॉग्निटिव्ह असेसमेंटच्या मदतीने ही चाचणी करण्यात आली. त्यात ट्रम्प यांना तीस पैकी तीस गुण मिळाले आहेत. ही चाचणी अल्झायमर झालेल्या वृद्धांसाठी असते. रोजचे त्यांचे काम पाहता ते कुशाग्र आहेत, त्यांच्या आकलनशक्तीत कुठलीही कमतरता नाही. डिसेंबरमध्ये दूरचित्रवाणीवरील भाषणात ट्रम्प यांनी मध्यपूर्वेच्या संदर्भात बोलताना भलतीच बडबड केली होती. त्यावर जॅकसन यांनी सांगितले, की सुडाफेड या नाक चोंदू नये म्हणून टाकल्या जाणाऱ्या औषधामुळे तसे झाले असावे. ट्रम्प यांना मानसिक समस्या आहेत असा आरोप होत आहे. त्यावर जॅकसन यांनी सांगितले, की हे आरोप ‘टॅब्लॉइड’ मानसिकतेतून होत आहेत.

ट्रम्प यांच्या हृदयाची स्थिती स्टेस टेस्टमध्ये उत्तम आहे. त्याचे वजन १०८ किलो असून ते ६ फूट ३ इंच उंच आहेत, त्यांनी १० ते १५ पौंड वजन कमी केल्यास चांगले होईल. सध्या ते लठ्ठपणाच्या सीमारेषेवर आहेत. त्यांना वजन कमी करण्यासाठी आहार व इतर उपाय सांगितले आहेत. त्यांना ४.५ ते ६ किलो चरबी वर्षभरात कमी करता येईल. त्यांचे कोलेस्टेरॉल सारखे वाढते त्यासाठी त्यांना क्रेस्टरचा डोस दिला जातो. त्यांनी ध्यानधारणा केली तर त्यांचे कोलेस्टेरॉल आणखी कमी होईल. ट्रम्प यांना दृष्टी, नाक, कान, घसा यांचे कुठलेही प्रश्न नाहीत.

प्रकृतीचे रहस्य जनुकात

ट्रम्प खूप जंक फूड खातात मग त्यांची प्रकृती चांगली कशी, असे एका वार्ताहराने विचारले असता त्यांनी सांगितले, की ते जंकफूड व कोक घेत असले तरी त्यांची जी जनुके आहेत ती वेगळी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. जनुकशास्त्रामुळे हे घडते. काही लोकांमध्ये जनुकेच वेगळी असतात पण त्यांनी जर आरोग्यदायी आहार वीस वर्षे घेतला असता तर ते दोनशे वर्षे जगले असते. त्यांच्या जनुकात ती जादू आहे. त्यांना सकाळी उठण्याची सवय आहे. त्यांना ताण येत नाही किंवा तो लगेच कमी करता येतो त्यामुळे असा अध्यक्ष मी पाहिला नव्हता. ते रात्री  चारपाच तास झोपतात, त्यामुळे कदाचित ते यशस्वी असावेत. व्हाइट हाउसचे शेफ (खानसामे) आता आरोग्यदायी आहार बनवतात. एकूणच जॅकसन हे अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत खूश असून त्यांनी केलेल्या चाचण्यात त्यांना क र्करोग, मधुमेह, सांध्याच्या समस्या नसल्याचे दिसते आहे. त्यांचे यकृत, मूत्रपिंड व थायरॉइडसही व्यवस्थित आहेत, असे त्यांनी सांगितले.