अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी होत असलेल्या निवडणुकीत पुढील आठवडय़ात व त्यानंतर ‘प्रायमरीज’ होणार असलेल्या बहुतांश राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे नेते डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनी आघाडी मिळवली असल्याचे जनमत चाचणीच्या ताज्या आकडेवारीवरून दिसत आहे.

येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या प्रतिनिधींचे पाठबळ मिळवण्याचे लक्ष्य साधायचे असल्यामुळे ‘प्रेसिडेंशियल प्रायमरीज’चा पुढचा टप्पा ट्रम्प व क्लिंटन या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे.

ताज्या जनमत चाचणीनुसार, ट्रम्प हे कॅलिफोर्नियामध्ये त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी सिनेटर ट्रेड क्रूझ यांच्यापेक्षा २७ गुणांच्या (पॉइंट्स) प्रचंड मताधिक्याने आघाडीवर असून, इंडियाना राज्यात ते क्रूझ यांच्यापेक्षा ८ गुणांनी पुढे आहेत. अलीकडेच झालेल्या या दोन्ही जनमत चाचण्या ‘फॉक्स न्यूज’ने घेतल्या आहेत.