Donald Trump India tour : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प, जावई जॅरेड कुशनर यांच्यासह सोमवारी पहिल्यावहिल्या भारत भेटीवर येत आहेत. भारत दौऱ्यासाठी ट्रम्प आपल्या सहकाऱ्यासोबत वॉशिंग्टनहून रवाना झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार ते रविवार रात्री सव्वा आठ वाजता वॉशिंग्टनहून रवाना झाले आहेत. त्यांचे सकाळी ११.४० वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन होणार आहे. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली माहितीनुसार ट्रम्प यांचं सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी अहमदाब विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ट्रम्प दाम्पत्याची १२.१५ वा. साबरमती गांधी आश्रमाला भेट देण्याची शक्यता असल्याने तेथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच साबरमती नदीच्या किनाऱ्यावर ट्रम्प आणि मोदी यांच्या प्रतिमा असलेली मोठमोठी होर्डिग्ज लावण्यात आली आहेत. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी १.०५ वा. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण होईल. येथे लाखो भारतीयांना ट्रम्प संबोधित करणार आहेत. दुपारी ३.३० वा. ट्रम्प आणि मेलानिया आग्य्राला प्रयाण करतील आणि सायंकाळी ५.१५ वा. जगप्रसिद्ध ताज महालला भेट देतील.

आग्र्यात तयारी : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया, कन्या इव्हान्का हे सर्वजण आग्रा येथील ताजमहालला भेट देणार असून त्या निमित्ताने त्यांना तेथील ब्रिज संस्कृतीची ओळख होणार आहे. शहरात सगळीकडे ट्रम्प यांच्या स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले आहेत. नमस्ते ट्रम्प मेळाव्यानंतर ते आग्रा येथे येणार आहेत. सूर्यास्तापूर्वी एक तास अगोदर ते ताजमहाल बघतील. नंतर दिल्लीला रवाना होतील. त्या निमित्ताने शहरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. बहुस्तरीय सुरक्षा कवच तैनात असून अमेरिकेची गुप्तचर सेवा, भारताचे एनएसजी कमांडो यांचा त्यात समावेश आहे. आग्र्याचे विभागीय आयुक्त अनिल कुमार यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या वाहनांचा काफिला १३ कि.मी. अंतर कापणार आहे.

दिल्लीत मौर्य हॉटेलमध्ये मुक्काम
दिल्लीत आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून लष्कर, निमलष्करी दले व अमेरिकेची सुरक्षा असे नियोजन आहे. सहा जिल्ह्य़ांतील पोलीस तसेच केंद्रीय सशस्त्र दलांच्या ४० कंपन्या तैनात केल्या आहेत. ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून चाणक्यपुरीत हे हॉटेल आहे. ट्रम्प व मेलानिया यांचे येथे सोमवारी रात्री कुंकुमतिलक लावून व पुष्पहार घालून स्वागत केले जाईल. चाणक्य या सूटमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली असून यापूर्वी जिमी कार्टर, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश यांचीही व्यवस्था याच सूटमध्ये केली होती. ट्रम्प यांना सोन्याच्या ताटात जेवण व चांदीच्या पेल्यात चहा दिला जाणार आहे.

राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर साडे दहा वाजता राजघाटवर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पाजंली अर्पण करतील. सकाळी ११ वाजता ट्रम्प हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक औपचारिक बैठक होईल.

मोदींसोबत चर्चा –
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी मोदी हे आपले खास मित्र असल्याचे म्हटले असले तरी भारताने आयात कर लादून अमेरिकेचे नुकसान केल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार तूट कमी करण्याच्या दिशेने उपाययोजना करणे हाच या भेटीचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येते. संरक्षण, दहशतवाद, विद्युत आदी मुद्द्यांचा चर्चेत समावेश असेल. या दरम्यान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सोबतच दुपारचं जेवण घेतील.

राष्ट्रपतींसोबत रात्रीचं भोजन आणि परतीचा प्रवास

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह डोनाल्ड ट्रम्प सपत्नीक रात्री एकत्र जेवतील. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पण काँग्रेस पक्षानं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आह. रात्री १० वाजता ट्रम्प अमेरिकेसाठी रवाना होतील.