डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; सौदी अरेबियाला गंभीर परिणामांचा इशारा

पत्रकार व अमेरिकी नागरिक जमाल खाशोगी याला निश्चितच ठार मारण्यात आले असावे असे चित्र दिसत आहे. जर सौदी अरेबियाने खरेच त्याचा खून केला असेल तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. जमाल  खाशोगी हे  २ ऑक्टोबरपासून बेपत्ता असले तरी त्यांचा क्रूरपणे छळ करून ठार मारण्यात आले व नंतर त्यांचा मृतदेह सौदी अरेबियात नेण्यात आला असे सांगण्यात येत आहे. दरम्यान खाशोगी मारला गेल्याबाबत कुठलीही ध्वनिफीत उपलब्ध नाही असे तुर्कस्थानच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे याबाबत चर्चा क रण्यासाठी सौदी अरेबिया व तुर्कस्थानला जाऊन आले. खाशोगी हा २ ऑक्टोबरला सौदी अरेबियाच्या इस्तंबूल येथील दूतावासात गेला होता. तेथेच त्याला ठार मारण्यात आले असावे असा अंदाज आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवर संतप्त भावना उमटल्या असून खाशोगी हा अमेरिकेचा नागरिक आहे. तो दी वॉशिंग्टन पोस्टसाठी काम करीत होता. तो मारला गेला असेच आता मला वाटते आहे. हे फार दुर्दैवी आहे असे ट्रम्प यांनी अँड्रय़ूज हवाई तळावर पत्रकारांना सांगितले नंतर ते मोंटाना दौऱ्यावर गेले. तुर्कीश चौकशीकर्त्यांनी सांगितले की, खाशोगी याला दूतावासात छळ क रून ठार मारण्यात आले.

खाशोगीचा खून सौदी अरेबियाने केल्याचे दिसून आले तर काय करणार, असा सवाल केला असता ट्रम्प म्हणाले की, अतिशय गंभीर परिणाम होतील. हे वाईट आहे, पण अजून अंतिम चित्र स्पष्ट होण्याची वाट बघू या. आम्ही यावर कठोर निवेदन करणार आहोत. याबाबत तीन वेगवेगळ्या चौकशा सुरू असून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जातील.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांनी ट्रम्प यांची भेट घेऊन सांगितले की, सौदी अरेबियाला या प्रकरणी चौकशी पूर्ण करण्यासाठी अजून वेळ देण्यात यावा. ‘खाशोगीच्या मृत्यूचे प्रकरण अमेरिकेने गांभीर्याने घेतले असून त्याच्या  बेपत्ता होण्याचा मुद्दा आमच्यासाठीही गंभीर आहे असे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

दरम्यान परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हिथर नोएर्ट यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांनी कुठलीही ध्वनिफीत ऐकलेली नाही व त्या संबंधात कुठला मजकूरही पाहिलेला नाही.

शस्त्र विक्री थांबवण्याची सूचना

पॉम्पिओ यांच्याशी चर्चेनंतर ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, वेगवेगळ्या चौकशी संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार खाशोगी याचा खून करण्यात आला  आहे. सौदी अरेबियाला खाशोगीच्या प्रकरणानंतर लष्करी मदत बंद करण्याचा कायदा करण्यात यावा अशी मागणी जिम मॅकगव्हर्न यांच्यासह काही अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी केली आहे.

मृतदेह जंगलात किंवा शहरात नेल्याची शक्यता

इस्तंबूल : सौदीचा बेपत्ता पत्रकार जमाल खाशोगी याचे पार्थिव इस्तंबूलजवळच्या जंगलामध्ये अथवा अन्य शहरामध्ये नेण्यात आले असण्याची शक्यता तपास अधिकारी पडताळून पाहात आहेत, असे तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. इस्तंबूलमधील सौदीच्या वकिलातीमध्ये खाशोगी याची हत्या करण्यात आली होती.

वकिलातीची दोन वाहने २ ऑक्टोबर रोजी इमारतीमधून बाहेर पडली, त्याच दिवशी खाशोगी हा त्या इमारतीमध्ये गेला होता आणि त्यानंतर बेपत्ता झाला, असे अधिकाऱ्यांनी सदर वृत्तसंस्थेला सांगितले. यापैकी एक वाहन जवळच्या बेलग्रेड जंगलामध्ये गेले, तर दुसरे वाहन यालोवा शहराकडे गेले. मात्र पोलिसांनी या परिसराची पाहणी केली आहे का, ते त्वरित कळू शकले नाही.