Donald Trump Kim Jong Un summit in Singapore: उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यापूर्वी सिंगापूरमध्ये फेरफटका मारला. विशेष म्हणजे ऐरवी सुरक्षेचे कारण देत परदेश दौरे टाळणारे किम जोंग उन हे सिंगापूरमध्ये सहज वावरताना दिसत होते. शहरात फेरफटका मारताना सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांनी किम जोंग उन यांच्यासोबत सेल्फी काढला. हा सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

आज (मंगळवारी) किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सिंगापूरमध्ये शिखर बैठक होणार असून या बैठकीच्या पूर्वी किम जाँग उन यांनी सिंगापूरमधील परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांच्यासोबत शहरात फेरफटका मारला. किम जाँग उन अगदी सामान्य पर्यटकासारखे सिंगापूरमधील शहराची माहिती जाणून घेत होते. या दौऱ्या दरम्यान त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा ताफा होता. पण छायाचित्रकारांनाही किम जाँग उन सहजपणे सामोरे गेले.

फेरफटका मारताना विवियन बालकृष्णन यांना किम जोंग यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी किम जोंग यांच्यासोबत स्वत:च्या मोबाइलमध्ये सेल्फी काढला आणि काही वेळाने तो स्वत:च्या ट्विटरवर अकाऊंटवरुन पोस्ट केला. अवघ्या काही क्षणातच हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. किम जोंग उन यांचा हा पहिलावहिला सेल्फी असल्याचे सांगितले जाते.

किम जोंग उन रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या हॉटेलमधून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. किम जोंग उन हे मरिना बे सँड्स या सिंगापूरमधील प्रतिष्ठित हॉटेलच्या ५६ व्या मजल्यावर गेले. या हॉटेलच्या ५६ व्या मजल्यावर ऑब्झर्वेशन डेक असून तिथून एका बाजूला अथांग सागर तर दुसऱ्या बाजूला सिंगापूर न्याहाळता येतो. किम जोंग उन बराच वेळ ऑब्झर्व्हेशन डेकवर थांबले होते.